खेळते भांडवल योजनेचा जिल्हा बँकेकडून खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:19 AM2020-12-29T04:19:58+5:302020-12-29T04:19:58+5:30
अहमदनगर : कोणतेही कर्ज हे किमान वर्षभरासाठी असते. जिल्हा सहकारी बँकेने मात्र खेळते भांडवल योजनेतील कर्जाची सहा महिन्यांतच वसुली ...
अहमदनगर : कोणतेही कर्ज हे किमान वर्षभरासाठी असते. जिल्हा सहकारी बँकेने मात्र खेळते भांडवल योजनेतील कर्जाची सहा महिन्यांतच वसुली करण्याचा आदेश दिला आहे. यावर कळस असा की अनेक शेतकर्यांची कर्ज प्रकरणे अजून मंजूर झालेली नाहीत. यावरून जिल्हा सहकारी बँकेने खेळते भांडवल योजनेचा खेळ केला असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी खेळते भांडवल योजना आणली. ही योजना ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत ३४ हजार सभासद शेतकऱ्यांना २४० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. हे कर्ज वाटप करून सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. काही तालुक्यांतील शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अद्याप मंजूर झालेली नाहीत. असे असतानाच खेळते भांडवल योजनेंतर्गत वाटप केलेले कर्ज ३१ मार्चपर्यंत वसूल करण्याचा आदेश जिल्हा बँकेने विकास संस्थांना दिला आहे. सहा महिन्यांतच शेतकऱ्यांवर कर्ज परत करण्याची वेळ येणार आहे. त्यात डिसेंबर महिना चार दिवसांनी संपणार आहे. त्यामुळे जानेवारीत कर्ज मिळालेल्यांना तर तीन महिन्यांतच कर्ज परत करावे लागेल, असे सांगण्यात आले.
शासनाच्या कर्जमाफीमुळे जिल्हा सहकारी बँकेची तिजोरी भरली. सभासद शेतकरीही नवीन कर्जास पात्र ठरले. त्यामुळे बँकेकडून कर्ज वाटप करण्यात आले. चालू अर्थिक वर्षात बँकेने शेतकऱ्यांसाठी नवीन खेळते भांडवल योजना आणली. हे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विकास संस्थेत कागदपत्रांची पूर्तता केली; पण अनेकांचे कर्ज अद्याप मंजूर झालेले नाही. असे असताना वसुलीचे पत्र विकास संस्थेत धडकल्याने कर्ज वाटप करावे की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत विकास संस्था आहेत.
...
- कोरोनामुळे खेळते भांडवल योजना सुरू करण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे लगेच कर्ज वसुली करता येणार नाही. हे कर्ज भरण्यास सभासद शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याबाबतच बैठकीत चर्चा केली जाईल.
- सीताराम गायकर, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक