भूमी अभिलेख उपाधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी
By अरुण वाघमोडे | Published: April 25, 2023 01:35 PM2023-04-25T13:35:51+5:302023-04-25T13:36:45+5:30
राज्य शासन जनतेचे प्रश्न जलदगतीने मार्गी लागावे, यासाठी विविध उपयोजना करत आहे.
अहमदनगर : नगर शहरातील स्टेशन रोडवरील उपअधीक्षक भूमीअभीलेख कार्यालयात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे वेळेत काम होत नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी आंदोलन केले.
भूमी अभिलेख कार्यालयात नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या दैनंदिन कामकाजासाठी येत असतात. मात्र कार्यालयीन प्रमुख तथा उपअधीक्षक कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर राहत नसल्याने कामे अडकून पडतात. त्यामुळे ग्रामीण भागातून काम घेऊन येणाऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात.
राज्य शासन जनतेचे प्रश्न जलदगतीने मार्गी लागावे, यासाठी विविध उपयोजना करत आहे. येथील भूमी अभिलेख कार्यालयात मात्र, नागरिकांना खूपच वाईट अनुभव येत आहे. येत्या आठ दिवसांत कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता न आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.