खासदार गांधी यांचा पत्ता कट ? डॉ. सुजय विखे भाजपच्या मैदानात ?
By नवनाथ कराडे | Published: March 9, 2019 08:29 PM2019-03-09T20:29:18+5:302019-03-09T20:32:42+5:30
सतराव्या लोकसभा निवडणुकीतून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार होणार याबाबत चर्चा चांगलीच रंगात आली आहे.
नवनाथ खराडे
अहमदनगर : सतराव्या लोकसभा निवडणुकीतून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार होणार याबाबत चर्चा चांगलीच रंगात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी नेमके रिंगणात कोण उतरणार? याचे उत्तर मिळत नाही. तर शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे ही जागा भाजपची आहे, मात्र विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना तिकिट देण्यासाठी पक्षही उत्सुक नसल्याचे दिसत आहे. तर डॉ. सुजय विखे हे गेल्या दोन वर्षापासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, मात्र राष्ट्रवादी त्यांच्यासाठी जागा सोडत नाही. त्यामुळे नेमके रिंगणातील उमेदवार कोण? याबाबत राज्यभरात चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. विखे हे भाजपात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही शक्यता खरी ठरली तर खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता आपोआपच कट होईल.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी दोन वर्षापासून तयारी करत आहेत. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. काँग्रेसला जागा सोडण्यास शरद पवार तयार नाहीत. डॉ. विखेही राष्ट्रवादीत जाण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. अशातच विखे यांनी कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारीसाठी त्यांनी भाजपचे दरवाजेही ठोठावल्याची चर्चा आहे. अशातच भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन आज (शनिवार, ९ मार्च २०१९) नगरमध्ये दाखल होत बैठकही घेतली. यावेळी ‘राजकारणात काहीही होऊ शकते’ असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. त्यामुळे विखे यांच्या भाजप प्रवेशाला दुजोरा मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात डॉ. सुजय विखे भाजपात प्रवेश करून तिकिट पदरात पाडून घेतील, असा अंदाज बांधला जात आहे.
विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी भाजपही उत्सुक दिसत नाही. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे भाजपनेही उमेदवारांची शोधाशोध सुरु केल्याची चर्चा आहे. पहिल्यांदा १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी खासदार झाले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटीवर लढणारे माजी खासदार दादापाटील शेळके यांना २ लाख ५० हजार ५१ एवढी मते मिळाली. तर काँग्रेसच्या तिकिटावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस रिंगणात होते. त्यांना १ लाख ८८ हजार २५१ मते पडली. तर यावेळी खासदार दिलीप गांधी यांना २ लाख ७८ हजार मते मिळाली. २८ हजार ४५७ मतांनी गांधी विजयी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढल्याचा फायदा गांधी यांना यावेळी झाला. त्यानंतर २००४ मध्ये खासदार गांधी यांना पक्षाने तिकिट नाकारले. विधानपरिषद सभापती प्रा. ना.स. फरांदे यांना भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. परंतु प्रा. फरांदे यांना मतदारांनी नाकारले. त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख खासदार झाले. त्यानंतरील भाजपाच्या केंद्रिय नेतृत्वात बरेच बदल झाले. त्यामुळे २००९ मध्ये खासदार गांधी यांनी पुन्हा तिकिट मिळाले. यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार शिवाजी कर्डिले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. तर दिवगंत राजीव राजळे हे बंडखोरी करत लोकसभेच्या मैदानात उतरले. या निवडणुकीत कर्डिले यांना २ लाख ६५ हजार ३१६ मते मिळाली. राजीव राजळे यांना १ लाख ५२ हजार ७९५ मते मिळाली. तर गांधी यांना ३ लाख १२ हजार ४७ एवढी मते मिळाली. यावेळी ४६ हजार ७३१ मतांनी गांधी यांनी विजय मिळविला. त्यानंतर २०१४ मध्ये दिलीप गांधी यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजीव राजळे मैदानात होते. मात्र मोदी लाटेत गांधी पुन्हा खासदार झाले.
गेल्या पाच वर्षात गांधी यांच्याविरोधात सर्वसामान्यांची नाराजी वाढलेली दिसून येत आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्येही मतदारांनी खासदार गांधीना भरसभेत थेट प्रश्न विचारून पेचात पाडले. यावेळी राग अनावर झाल्याने मतदारांवर बरसलेले खासदार गांधी महापालिका निवडणुकीच्या वेळी सर्वांना दिसले. त्यानंतरही असे प्रसंग पाहावयास मिळाले. एकूणच शहरात भाजपाअंतर्गत गटातटाचे राजकारणही आजही पाहावयास मिळत आहे. आगरकर गट आणि गांधी गट आपआपले वेगळे राजकारण करत आहेत. एकमेंकाविरोधात तक्रारी थेट पक्षप्रमुखांकडे करतात. या गटातटाचा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपाला बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अॅड.अभय आगरकर यांना पराभव स्विकारावा लागला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्षपद खासदार गांधी यांच्याकडे आहे. मात्र त्यांना शहरात पक्षाची ताकद म्हणावी तितकी वाढवता आली नाही. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठे अपयश गांधी यांना स्विकारावे लागले. महापालिकेत ६८ नगरसेवक आहेत. त्यामध्ये भाजपाचे फक्त १४ नगरसेवक आहेत. केवळ शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादीने पाठींबा दिल्याने भाजपचा पहिल्यांदा महापौर झाला. मात्र भाजपाला शहरातील मतदारांनी सपशेल नाकारले. याचवेळी खासदार गांधी याचे पुत्र सुवेंद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांनाही पराभव स्विकारावा लागला. हा गांधी यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली फक्त १४ जागांवर विजय मिळविता आला. याशिवाय भाजपने केलेल्या तब्बल तीन सर्व्हेमध्ये ६० टक्के लोकांनी खासदार गांधी यांच्यावर नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. पालकमंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपकडून सर्व्हेमध्ये पसंती दर्शवली. मात्र यापैकी भानुदास बेरड वगळता कोणीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार नसल्याचे सूत्रांकडून कळते. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार पक्षपातळीवर झालेला असावा. त्यामुळे भाजप नवीन उमेदवारांची चाचपणी करत असावा.
भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी डॉ.विखे यांना अनेकवेळा भाजपमध्ये येण्याची खुली आॅफर दिली आहे. ‘विखे हे भाजपकडूनच खासदार होतील’, असेही वक्तव्य अनेक वेळा केले आहे. त्यामुळे आमदार कर्डिले यांची भविष्यवाणी खरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.