आढळगाव आदर्शगाव करण्याचे स्वप्न गांधी यांच्या निधनाने अधुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:47+5:302021-03-19T04:19:47+5:30
आढळगाव : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने आढळगाव (ता.श्रीगोंदा) आदर्शग्राम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. २०१४ साली खासदार ...
आढळगाव : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निधनाने आढळगाव (ता.श्रीगोंदा) आदर्शग्राम करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.
२०१४ साली खासदार झाल्यानंतर आढळगाव ‘संसद सदस्य आदर्शग्राम’ योजनेत घेतल्याचे गांधींनी जाहीर केले होते. विकासकामे मार्गी लावण्यासाठी विशेष लक्ष दिले. अडीअडचणींमध्ये आधार असणाऱ्या गांधी यांच्या निधनाने कार्यकर्त्यांनी पोरके झाल्याची भावना व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
१९९९ साली प्रथम लोकसभेवर निवडून गेल्यापासून गांधी यांची आढळगाव परिसरातील गावांशी नाळ जोडली गेली. भाजपा किसान मोर्चाचे तात्कालीन अध्यक्ष बळीराम बोडखे, देवराव वाकडे, गंगाराम दरेकर, दत्तात्रय जामदार, राजेंद्र भोस यांच्यासह अनेक कार्यकर्ते गांधी यांनी जोडले. आढळगाव ते गव्हाणेवाडी हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गांधी यांच्या प्रयत्नातून साकार झाला. आजही उत्कृष्ट दर्जासाठी रस्ता प्रसिद्ध आहे.
२०१४ साली खासदार झाल्यानंतर आढळगाव ‘संसद सदस्य आदर्शग्राम’ योजनेत समावेश करण्याचे त्यांनी जाहीर केले. गावातील आवश्यक कामांचा आराखाडा तयार केला. परंतु, या योजनेतून निधी मिळाला नाही तसेच गावातील राजकीय साठमारींमुळे गाव या योजनेपासून वंचित राहिले. तरीही विकासकामे राबविण्यासाठी दिलीप गांधी यांचा पाठपुरावा कायम असायचा. गावठाणातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे त्यांचे स्वप्न होते.
राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याकडून त्यांनी दोन रस्ते काँक्रिटीकरण करून दिले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी हा नाव्हरा ते आढळगावपर्यंत करण्यासाठी गांधी आग्रही राहिले. २०१९ साली पक्षाने खासदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतरही आढळगावच्या विकासकामांसाठी त्यांचा पाठपुरावा कायम होता.