गणेश आरतीवर होणार भरतनाट्यम् : १०० मुली धरणार ताल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:53 AM2018-09-12T11:53:51+5:302018-09-12T11:53:56+5:30
श्री गणेशाला कलेची देवता म्हणतात़ म्हणूनच गणेशोत्सव काळात विविध कलांचा संगम पहायला मिळतो. असाच कलेचा अनोखा संगम नगरमधील श्री विशाल गणेश मंदिरात शुक्रवारी (दि़. १४) नगरकरांना पहायला मिळणार आहे़ तब्बल १०० मुली गणेश आरतीवर भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.
अहमदनगर : श्री गणेशाला कलेची देवता म्हणतात़ म्हणूनच गणेशोत्सव काळात विविध कलांचा संगम पहायला मिळतो. असाच कलेचा अनोखा संगम नगरमधील श्री विशाल गणेश मंदिरात शुक्रवारी (दि़. १४) नगरकरांना पहायला मिळणार आहे़ तब्बल १०० मुली गणेश आरतीवर भरतनाट्यम नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.
गुरुवारी (दि़ १३) घरोघरी श्री गणेशाचे आगमन होत आहे. सार्वत्रिक गणेशोत्सवाचीही जोरदार तयारी सुरु आहे़ गणेश मंडळांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ नगर शहराचे आराध्य दैवत माळीवाडा येथील श्री गणेश मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरु आहे़ त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी १० वाजता सुमारे १०० मुली एकाच वेळी भरतनाट्यम्चे सादरीकरण करणार आहेत़ या सादरीकरणामध्ये ‘सुखकर्ता दुखहर्ता’ या आरतीने सुरुवात करुन ‘प्रणम्य शिरसां देवम्, ‘गणेश कौतुकम्’, ‘शिवकिर्तन’, ‘महिषासूर मर्दिनी स्तुती’ अशा विविध नृत्य प्रकाराचा समावेश आहे, अशी माहिती नृत्यप्रशिक्षिका सुरेखा डावरे यांनी दिली़ अहमदनगर शहरामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एकाचवेळी विद्यार्थिनी शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.