मुस्लीम बांधवांकडूनही गणेश प्रतिष्ठापना
By Admin | Published: September 7, 2014 12:02 AM2014-09-07T00:02:40+5:302014-09-07T00:05:14+5:30
श्रीरामपूरमधील याच मुस्लीम मोहल्ल्यात गेल्या तीन वर्षांपासून गणपतीबाप्पा मोठ्या दिमाखात बसू लागला आहे.
मिलिंदकुमार साळवे, श्रीरामपूर
जातीय दंगलींचे चटके असोत की जातीय तणाव असो. या प्रत्येक वेळी चर्चेत येतो तो मुस्लीम मोहल्ला. पण श्रीरामपूरमधील याच मुस्लीम मोहल्ल्यात गेल्या तीन वर्षांपासून गणपतीबाप्पा मोठ्या दिमाखात बसू लागला आहे. हे मुस्लीम तरूण अल्लाहप्रमाणेच गणपतीबाप्पाची आरतीही म्हणू लागले आहेत.
सय्यदबाबा उरूस झाला की श्रीरामपूरमध्ये लगेचच रामनवमी यात्रेस सुरुवात होते. दोन्ही धार्मिक सण, उत्सवांसोबतच श्रीरामपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, भगवान गौतम बुद्ध जयंती अशा विविध धर्मीयांच्या वेगवेगळ्या सण, उत्सवांना सुरुवात होते. राम-रहीम उत्सव समितीच्या वतीनेही हिंदू-मुस्लीम धर्मीयांचे सण-उत्सव, उरूस साजरे होतात. या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या श्रीरामपूरमध्ये गेल्या ३ वर्षांपासून मुस्लीम मोहल्ला असलेल्या गुलशन चौकात अलराजी ग्रुप गणेश मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
मंडळाचे अध्यक्ष सलीम शेख, श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती रियाजखान पठाण, संतोष चाबुकस्वार, दीपक शेकटकर, जब्बार बागवान, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य सुरेश दुग्गड, जुबेर कुरेशी, रिजवान पठाण, शाहरुख पठाण, सद्दाम शेख, मंगेश दुग्गड, संतोष काकडे, शैलेश अग्रवाल, मोहसीन शेख या कार्यकर्त्यांचा अलराजी ग्रुप गणेश मित्रमंडळात समावेश आहे. अलराजी ग्रुपच्या वतीने हे कार्यकर्ते वर्षभरात डॉ. आंबेडकर जयंती, शिवजयंती, रामनवमी, शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, कीर्तन, डोळे तपासणी, रांगोळी स्पर्धा, पाण्याचे महत्त्व समजावून पाणी बचत असे उपक्रम राबवून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून शेवटच्या दिवशी परिसरातील सर्वधर्मीयांसाठी भंडारारूपी जेवण प्रसादाचे आयोजनही करीत आहेत. या मंडळाने श्रीरामपूरच नव्हे राज्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याची, राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिष्ठापना करणारा नवा आदर्श घालून दिला आहे.