दरोडेखोरांची टोळी गजाआड
By Admin | Published: September 8, 2014 12:17 AM2014-09-08T00:17:23+5:302014-09-08T00:34:51+5:30
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेगाडीचा वेग कमी झालेला असताना प्रवाशांचा मोबाईल हिसकावणे, पाकीटमारी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांची टोळी जेरबंद केली.
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेगाडीचा वेग कमी झालेला असताना प्रवाशांचा मोबाईल हिसकावणे, पाकीटमारी करणाऱ्या तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांची टोळी गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने शनिवारी रात्री जेरबंद केली. त्यांचा साथीदार पळून गेला असून, आरोपींकडून १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील जालाननगरात फत्ते करण्यात आली.
त्यांच्या जवळ मिरची पावडरच्या दोन पुड्या, एक धारदार चाकू, एक सुरा तसेच वेगवेगळ्या कंपन्यांचे १८ मोबाईल हँडसेट, असा सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
क्रांती कांतीलाल भोसले (२५, रा. लाल माती, भावसिंगपुरा), रमेश भगवान शिंदे (२५, रा. राजीवनगर), गोलू दगडू काळे (५०, रा. राजीवनगर), संजू गोलू काळे (२०, रा. लाल माती, भावसिंगपुरा), जितेंद्रकुमार अवधेशप्रसाद यादव (२०, रा. भावसिंगपुरा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वेचा वेग मंद असतो. तेव्हा आरोपी हे प्रवाशांचा मोबाईल हिसकावून रेल्वेतून उडी मारून निघून जातात. तसेच काही जण प्रवाशांना दगड मारून लुटमार करतात, अशा प्रकारची माहिती मिळाली होती.
दरम्यान, आरोपी क्रांती भोसले आणि त्याचे साथीदार जालाननगर परिसरातील अमृत कॉम्प्लेक्स येथे गुन्हा करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.
त्याआधारे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त बाबाराव मुसळे, निरीक्षक आघाव, शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, पोलीस कर्मचारी मच्छिंद्र ससाणे, रावसाहेब जोंधळे, नितीन मोरे, भीमराव आरके, अशोक नागरगोजे आदींनी आरोपींना वेढा घालून जेरबंद केले.