राहुरी पोलिसांनी पकडली मोटारसायकल चोरांची टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 06:35 PM2018-02-20T18:35:31+5:302018-02-20T18:36:21+5:30
धी मोटारसायकल चोरून न्यायची. नंतर तिच मोटारसायकल तिच्या मालकाकडून पाच ते दहा हजार रूपये उकळून परत करायची अशा पद्धतीने पैसे उकळणारी एक टोळी राहुरी पोलिसांनी पकडली.
राहुरी : आधी मोटारसायकल चोरून न्यायची. नंतर तिच मोटारसायकल तिच्या मालकाकडून पाच ते दहा हजार रूपये उकळून परत करायची अशा पद्धतीने पैसे उकळणारी एक टोळी राहुरी पोलिसांनी पकडली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मदतीने राहुरी पोलिसांनी रविवारी ही टोळी गजाआड केली.
तनपुरेवाडीजवळील सुनील सुधाकर गाडे यांची स्प्लेन्डर मोटरसायकल १७ फेब्रुवारीस दुपारी तनपुरे वाडी रस्त्यावरून चोरीस गेली होती. त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल मिळाली नाही. त्यांच्याशी १८ फेब्रुवारीस एका निनावी क्रमांकावरून मोबाईलद्वारे संपर्क साधून तुमची गाडी पाहिजे असेल तर आठ हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर तुमची गाडी परत मिळणार नाही, असे सांगण्यात आले. पैसे देण्याची तयारी दाखविल्यानंतर गाडेंना पैसे घेऊन देवळाली प्रवरा येथे बोलाविले. गाडे व त्यांच्या मुलाने हा प्रकार नगराध्यक्ष कदम यांना सांगितले. कदम यांनी तात्काळ देवळाली पोलीस चौकीला माहिती दे त्यांचे कार्यकर्ते गाडेंच्या मदतीला पाठविले. सहाय्यक फौजदार अनिल गायकवाड, पोलीस नाईक गणेश फाटक, गौतम लगड, सतीश त्रिभुवन तसेच देवळालीचे नगरसेवक सचिन ढूस, शशिकांत मुसमाडे, मंगेश ढुस, तुषार बो-हाडे, शुभम कदम, अजित मोरे, गणेश ढेरे यांनी सापळा लावला. चोरट्याने गाडे यांना त्यांची मोटरसायकल परत करण्यासाठी पैसे तेथील एका दुकानदारांकडे देण्यास सांगितले. गाडे यांनी पाच हजार रूपये त्या दुकानात दिल्यानंतर तुमची गाडी नगर मनमाड रोड लगतच्या पुठ्ठयाच्या कारखान्याजवळ तुमची मोटारसायकल उभी केल्याचे सांगितले.
गाडे यांनी तेथे जाऊन दुचाकी ताब्यात घेतल्यानंतर गाडे यांना पुन्हा मोबाईलवरून आणखी दोन हजार रुपये घेऊन कारखाना परिसरात येण्यास सांगितले. दोन हजार रूपये घेऊन गाडे जाताच सापळा लावून असलेले कार्यकर्ते पोलिसांनी दौलत सुखदेव गायकवाड (रा.राहुरी), भूषण देवदत्त पाटोळे (रा. राहुरी खुर्द) व कैलास पवार (रा. कोंढवड) या तिघांच्या टोळीला पैसे घेताना रंगेहात पकडले.
संपर्क साधण्याचे आवाहन
सुनील गाडे यांच्या फिर्यादीवरूनराहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड तपास करीत आहेत. आरोपींकडून आणखी ब-याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे जर कोणाची गाडी पैसे देऊन परत केली असेल, अशांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.