कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद; दरोड्याच्या तयारीत असताना इमापूर घाटातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:53 PM2017-12-06T13:53:02+5:302017-12-06T13:57:17+5:30
नगर शहरासह जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी कुख्यात दरोडेखारांची टोळी स्थानिक शाखेने येथील इमामपूर घाटातून मंगळवारी रात्री जेरबंद केली.
अहमदनगर : नगर शहरासह जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी कुख्यात दरोडेखारांची टोळी स्थानिक शाखेने येथील इमामपूर घाटातून मंगळवारी रात्री जेरबंद केली.
या टोळीत चौघांचा समावेश असून त्यांच्याकडून चाकू, कटावणी, लाकडी दांडे असे हत्यारे जप्त केली आहेत. अभिमान शिवदास पवार (वय २९, रा. वडजी ता. पैठण,), सारस विठ्ठल काळे (वय ३२, रा. राहडगाव ता. पैठण), प्रविण अर्पण भोसले (वय २२, रा. गलांडे देऊळगाव, ता़ श्रीगोंदा) व सिचन रूस्तम चव्हाण (वय २२, रा. निपाणी जळगाव ता. पाथर्डी) असे पकडलेल्या दरोडेखारांची नावे आहेत. या चोरट्यांनी नगर शहरात तोफखाना हद्दीत विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
चार दरोडेखोर इमामपूर घाटात लपले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीधर गुठ्ठे, राजकुमार हिंगोले, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, कास्टेबल सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, फकीर शेख, भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डिले, मनोहर शेजवळ, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे, विजयकुमार वेठेकर, सचिन अडबल, विशाल अमृते, विनोद मासाळकर, किरण जाधव, मच्छिंद्र बर्डे, किरण जाधव यांच्या पथकाने मंगळवारी रात्री इमामपूर घाटात सापळा लावून दरोडेखोरांना अटक केली.
टोळीतील अभिमान पवार याच्यावर फुलंब्री, करमाड, पैठण, पाचोड, काचोड आदी पोलीस ठाण्यात तब्बल बारा गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी सारस विठ्ठल काळे याच्यावर पैठण, शेगाव, चिखली, जळगाव आदी ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. नगर शहरात विविध ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये या चोरट्यांचा हात असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.