दीड लाखांच्या मुद्देमालासह आंतरराज्य लुटारुंची टोळी अहमदनगरमध्ये जेरबंद
By साहेबराव नरसाळे | Published: May 21, 2023 07:07 PM2023-05-21T19:07:26+5:302023-05-21T19:08:29+5:30
तिसरा आरोपी फरार असल्याचे पाेलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर : अहमदनगर शहरातील लग्न समारंभातून रोख रक्कम व मोबाईलची चोरी करणारी आंतरराज्य आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. आरोपींकडून १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, तिसरा आरोपी फरार असल्याचे पाेलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
याबाबत यमुना रघुनाथ लांडगे (वय ७५, रा. लांडगेमळा, ता. नगर) यांनी फिर्याद दिली. लांडगे या १२ मे रोजी सावेडी उपनगरातील एका लॉनमध्ये लग्न समारंभासाठी आल्या होत्या. त्यावेळी एका अनोळखी इसमांनी त्यांनी २ लाख १० हजार रुपये रक्कम व मोबाईल फोन असलेली पर्स चोरुन नेली. याबाबत लांडगे यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांचे एक पथक समांतर तपास करीत होते. या गुन्ह्यातील आरोपी हे मध्यप्रदेश पासींग असलेल्या निळ्या मोटारसायकलवरुन पुणे येथुन नगरकडे येत आहेत, अशी माहिती आहेर यांना मिळाली होती. त्यावरुन आहेर यांच्या पथकाने सुपा टोल नाका परिसरात सापळा लावून प्रदिप कालुसिंग दपानी (वय २४, रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड; मध्यप्रदेश), अमित पन्नासिंग सासी (वय १९, रा. लक्ष्मीपुरा, ता. गोगर, जि. बारहा, राजस्थान) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८० हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केली. ही रक्कम नगर शहरातील एका लॉनमधून लग्नसमारंभातून चोरल्याची कबुली त्यांनी दिली.
तसेच उर्वरीत १ लाख रुपये हे त्यांनी वसंत कुमार (पूर्ण नाव माहित नाही. रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) व कालुसिंह (पूर्ण नाव माहित नाही. रा. लक्ष्मीपुरा राजस्थान) यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले मोबाईल हे फेकुन दिल्याचे आरोपींनी सांगितले. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी भुपेद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया (रा. कडीयासासी, मध्यप्रदेश) हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे ८० हजार रुपये, एक मोटारसायकल व दोन मोबाईल असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.