पाळत ठेवून रस्ता लूट करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:19 PM2018-11-03T13:19:51+5:302018-11-03T13:19:56+5:30
व्यापाऱ्यांवर पाळत ठेवत हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणा-या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले
अहमदनगर : व्यापाऱ्यांवर पाळत ठेवत हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणा-या पाच जणांच्या टोळीला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
दीपक सखाराम केदारी (वय ३२ रा़ बुरूडगाव, नगर), गणेश दत्तात्रय आजबे (वय २२ रा़ शिराळ ता़ आष्टी जि़ बीड), आदम जलाल शेख (वय १९ रा़ फक्राबाद ता़ जामखेड) व अशोक उर्फ युवराज दिलीप राऊत (वय २८ रा़ वाळुंज ता़ आष्टी) असे अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत़ या टोळीने ३० आॅक्टोबर रोजी रात्री आठ वाजता कापसाचे व्यापारी समीर वसंत दसपुते (रा़ बोधेगाव)यांची कार औरंगाबाद रोडवरील इमामपूर परिसरात अडविली़ यावेळी कारच्या काचा फोडून चाकूचा धाक दाखवत दसपुते यांच्याकडील ८ लाख ४५ हजार रूपये हिसकावून नेले होते़ याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने समांतर तपास सुरू होता़ हा गुन्हा दीपक केदारी व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस नाईक अण्णा पवार, दत्ता गव्हाणे, रवींद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मनोज गोसावी, सोन्याबापू नाणेकर, मन्सूर सय्यद, सचिन अडबल, राहुल सोळुंके, बाबासाहेब भोपळे, देविदास काळे यांच्या पथकाने आरोपींना नगर व आष्टी परिसरातून अटक केली़ पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
दीपक केदारी मास्टरमाइंड
नगर येथील दीपक केदारी हा या पाच जणांच्या टोळीचा प्रमुख आहे़ व्यापाºयांवर पाळत ठेवून त्यानेच इतरांना याबाबत माहिती देत इमामपूर येथे लूट केली होती़ या टोळीने आणखी किती ठिकाणी लूटमार केली आहे़ याचा तपास पोलीस करत आहेत़