गंगामाई साखर कारखान्याचे साडेबारा लाख टन ऊस गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:43+5:302021-05-08T04:21:43+5:30
शेवगाव : तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याने यंदा १२.५५ लाख मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे ...
शेवगाव : तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याने यंदा १२.५५ लाख मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संदीप सातपुते यांच्या हस्ते ऊस वाहतूक वाहनांची व गव्हाणीची पूजा करून गाळप हंगामाची सांगता करण्यात आली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. या गाळप हंगामात अतिरिक्त ऊस क्षेत्र, उसाच्या हेक्टरी उत्पादनात झालेली वाढ व कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे साखर कारखान्यापुढे नोंदलेल्या संपूर्ण उसाचे वेळेवर गाळप करण्याचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत ही गंगामाई कारखान्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी यांनी कारखान्याचे अध्यक्ष पद्माकर मुळे, कार्यकारी संचालक रणजीत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करून १९२ दिवसांत १२.५५ लाख मे.टन उसाचे उच्चांकी गाळप करून नोंदणी झालेल्या संपूर्ण उसाचे वेळेवर गाळप केले आहे.
कारखान्याचे अध्यक्ष पद्माकर मुळे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी कारखान्यातील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना दहा दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एस. एन. थिटे, उपाध्यक्ष व्ही. एस. खेडेकर, व्यवस्थापक एस. डी. पवार, प्रॉडक्शन मॅनेजर आर. पी. वाळुंज, मुख्य शेतकी अधिकारी आर. एस.कचरे, शेतकी अधिकारी संदीप मनाळ, कारखान्याचे कामगार, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
---
०७ गंगामाई
गंगामाई साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगाम सांगताप्रसंगी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाची पूजा करताना संदीप सातपुते व इतर.