कर्नाटक राज्यातील गुन्हेगारांची टोळी पकडली; नेवासा फाटा येथे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:03 PM2020-02-16T18:03:13+5:302020-02-16T18:03:48+5:30
दरोड्याच्या तयारीत निघालेल्या कर्नाटक राज्यातील चार गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर-औरंगाबाद रोडवरील नागापूर शिवारात ही कारवाई करण्यात आली.
अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत निघालेल्या कर्नाटक राज्यातील चार गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगर-औरंगाबाद रोडवरील नागापूर शिवारात ही कारवाई करण्यात आली.
देवराज कृष्णप्पा खडमंची, (वय ४५), मारुती शिवकुमार खडमंची (वय १९ राक़र्नाटक), रवी आनंद खडमंची (वय ३५), नागराज देवराज खडमंची (वय १९ सर्व रा़ गुलबर्गा कर्नाटक) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. आरोपींकडून एक मोटारसायकल, स्टिलचा सत्तूर, दोन लाकडी दांडे, पाच मोबाईल असा २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी आधी नेवासा येथून चार लाख रुपयांची चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ़ सागर पाटील, उपाधीक्षक मंदार जावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब मुळीक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक रविंद्र कर्डिले, विशाल दळवी, रविकिरण सोनटक्के, अण्णा पवार, शिवाजी ढाकणे, राहुल सोळुंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.