ज्वारी काढणीस बोलवाव्या लागतात मराठवाड्यातून टोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:38+5:302021-02-14T04:19:38+5:30

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात ज्वारी काढणी सुरू असून मजूर टंचाईने शेतकरी हैराण झाले आहेत. अधिकची ...

Gangs from Marathwada have to be called for sorghum harvesting | ज्वारी काढणीस बोलवाव्या लागतात मराठवाड्यातून टोळ्या

ज्वारी काढणीस बोलवाव्या लागतात मराठवाड्यातून टोळ्या

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात ज्वारी काढणी सुरू असून मजूर टंचाईने शेतकरी हैराण झाले आहेत. अधिकची मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मराठवाड्यातील वेगवेगळ्या गावातून मजूर आणावे लागत आहेत. त्यामुळे ज्वारी काढणीचा खर्च वाढत आहे.

यंदा चिचोंडी पाटील परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ज्वारी पेरणी केली. काही परिसरात ज्वारीचे पीक जोमातही आले. सध्या ज्वारीची काढणी सुरू आहे. मात्र मजूर टंचाईने शेतकरी हैराण झाले आहे. मजुरीचे जास्तीचे पैसे मोजूनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी मराठवाड्यातील वेगवेगळ्या गावातून स्व खर्चाने वाहन करून मजूर घेऊन येत आहेत. मात्र आता तर मराठवाड्यातील मजुरांच्या टोळ्याही काही शेतकऱ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे असे शेतकरी कुटुुंबीयांसह अथवा मित्रमंडळींना एकत्र करून ज्वारी काढणी करत आहेत.

शेतकरी काकासाहेब कोकाटे म्हणाले, महिलांना साडेतीनशे रुपये रोजंदारी द्यायचे मान्य करूनही आठवडाभरात एकही मजूर मिळाला नाही. सव्वाएकर ज्वारी काढणीस सात हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे पत्नीसह ज्वारी काढणीस सुरुवात केली. ज्वारी काढणी व्यतिरिक्त गुड बांधणी, कणसे मोडणी, मळणी याचा खर्चही वाढतो. परिणामी ज्वारी क्षेत्र घटत आहे, असे कोकाटे यांनी सांगितले.

----

गावातील महिला मजूर मिळेनात त्यामुळे शेवटी दादेगावच्या (ता. आष्टी, जि. बीड) महिला टोळीचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांच्याशी संवाद साधत वाहनाची व्यवस्था करून १५ महिलांना बोलावून ज्वारी काढणी करून घेतली.

-राहुल बबन खराडे,

शेतकरी, चिचोंडी पाटील

----

ज्वारी काढणी टोळी मुकादम सध्या ज्वारी काढणीस लांबून लांबून बोलवले जाते आमची अठरा महिलाची टोळी असून आमची येण्याजाण्याचा खर्च घेऊन प्रत्येक महिलेस तीनशे रुपये मजुरी घेतो. आसपासच्या भागातून आमच्या टोळीस मोठी मागणी आहे.

-संगीता गोरख शिंदे,

दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड

फोटो १३ ज्वारी

चिचोंडी पाटील परिसरात आष्टी तालुक्यातून ज्वारी काढणीस आणलेले मजूर.

Web Title: Gangs from Marathwada have to be called for sorghum harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.