गणपती चालले गावाला़
By Admin | Published: September 7, 2014 11:43 PM2014-09-07T23:43:51+5:302014-09-07T23:47:24+5:30
अहमदनगर : महापालिकेची गणेश विसर्जनासाठी सुरू असलेली तयारी पूर्ण झाली आहे़
अहमदनगर : महापालिकेची गणेश विसर्जनासाठी सुरू असलेली तयारी पूर्ण झाली आहे़ शहरासह सावेडी उपनगरात बाप्पांच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, मिरवणूक मार्गावर पॅचिंग करण्यात आले आहे़ त्यामुळे बाप्पांच्या मिरवणुकीतील खड्ड्यांचे विघ्न काहीअंशी दूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे़
आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत़ सार्वजनिक गणेश मंडळांची लगबग सुरू आहे़आता सर्वांनाच वेध लागले आहेत, ते बाप्पांच्या मिरवणुकीचे़ मिरवणुकीची जय्यत तयारी मंडळ समितीकडून सुरू आहे़ शहरासह उपनगरांत २२५ मंडळांनी तसेच घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे़ सोमवारी लाडक्या गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे़ त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विसर्जनाची तयारी सुरू होती़
महापालिकेने मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटविणे, दिवा बत्तीची सोय आणि खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ ही मोहीम पूर्ण झाली आहे़ रामचंद्र खुंट ते दिल्लीगेट परिसरातील रस्त्यांवरील खड्डे खडी व डांबर टाकून बुजविण्यात आले आहेत़ बंद पडलेले पथदिवेही सुरू करण्यात आले असून, मिरवणूक मार्गावर लखलखाट झाला आहे़ मिरवणूक मार्ग आणि विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे़
नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते़ त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला होता़ प्रमुख रस्त्यांची डागडुजी करून झाली आहे़अतिक्रमण विरोधी पथकाकडून मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहे़ रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्याचे ढिग उचलले आहेत़
जाहिरात फलक उतरवून घेण्यात आले आहेत़ विद्युत वाहक तारा मिरवणुकीत अडथळा निर्माण करतात, त्या तारा दुरुस्त करण्याची मागणी पुढे आली आहे़ मिरवणूक मार्गाची पाहणी करून दुरुस्ती केली जाणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले़
(प्रतिनिधी)
शहरासह सावेडी उपनगरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत़तसेच रस्त्यावरील टपऱ्या, पथारीवाले हटविण्यात आले आहेत़ दिवाबत्तीचीही व्यवस्था करण्यात आली असून, शहरासाठी कल्याण महामार्गावरील बाळाजीबुवा विहीर येथे व्यवस्था करण्यात आली आहे़ तर सावेडी उपनगरात पाईपलाईन रस्त्यावरील यशोदानगर येथील विहीर येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे़ सोमवारी सकाळी पुन्हा मिरवणूक मार्गाची संयुक्त पाहणी करून आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे़
-सुरेश इथापे, प्रमुख, अतिक्रमण विरोधी पथक