आंबी दुमाला येथे शेत मजुराच्या घरात गॅसचा स्फोट; सर्व साहित्य जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:40 PM2022-06-02T18:40:47+5:302022-06-02T18:41:36+5:30
या आगीत संबंधित व्यक्तीचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य, दुचाकी, कागदपत्रे, सोने जळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही.
संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील ढेरंगे पाईन वस्ती (आंबी दुमाला) येथे स्वयंपाकाच्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीची झळ शेजारील एका घरालाही बसली. स्फोट झालेल्या घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये कागदपत्रांसह,दुचाकी, दागिन्यांचेही नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि.२ जून) रोजी सायंकाळी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेली माहितीनुसार, चंद्रकांत धावजी भुतांबरे हे साकूर येथील रहिवासी आहेत. ते उदरनिर्वाहासाठी आंबीदुमाला येथे कुटुंबासमवेत शेतजमीन वाट्याने करतात. त्यांना दुसरी व तिसरीत शिकणारी दोन लहान मुले आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमारास ते कुटुंबासमवेत घरालगतच्या शेतात काम करत होते.
दरम्यान, साडेतीन वाजता अचानक गॅसचा स्फोट होऊन त्यांच्या राहत्या छप्पराच्या घराला आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य, दुचाकी, कागदपत्रे, सोने जळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच आंबी दुमाला येथील योगेश नरवडे, सागर वाघमारे, दीपक मोरे,तान्हाजी आल्हाट यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत महसूल प्रशासनाला माहिती देण्यात आली.
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथे शेत मजुराच्या घरात गॅसचा स्फोट; सर्व साहित्य जळून खाक#GasCylinderBlast#Sangamnerpic.twitter.com/N7rEvKqq8L
— Lokmat (@lokmat) June 2, 2022
दरम्यान, भुतांबरे हे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आपले गाव सोडून दुसऱ्या गावात आले आहेत त्यात अशी घटना घडल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.