विद्यापीठ वसाहतीमध्ये गॅसचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:18 AM2021-01-04T04:18:59+5:302021-01-04T04:18:59+5:30
अशोक आत्माराम पाटील (रा. श्रीदत्त वसाहत, राहुरी खुर्द) यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घरासमोरील श्री दत्त मंदिरात ...
अशोक आत्माराम पाटील (रा. श्रीदत्त वसाहत, राहुरी खुर्द) यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घरासमोरील श्री दत्त मंदिरात दैनंदिन पूजेसाठी पहाटे सव्वाचार वाजता पाटील घराबाहेर पडले. त्यांच्या पत्नी नुकत्याच झोपेतून उठल्या होत्या. घरात दोन मुलगे, एक भाचा, एक भाची झोपलेले होते. एका खोलीत सीलबंद भरलेले गॅस सिलिंडर ठेवले होते. तेथे अचानक अग्नितांडव सुरू झाले. घरातील सर्वजण तत्काळ बाहेर धावले. गॅस सिलिंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाला.
श्रीदत्त मंदिरात गेलेले पाटील यांनी स्फोटाचा आवाज ऐकून, घराकडे धाव घेतली. तोपर्यंत चारही खोल्यांमध्ये आग पसरली. घरातील अंथरुण- पांघरुण, कपडे, स्टीलची दोन कपाटे, एक फ्रीज, अन्नधान्य, किराणा सामान, घरगुती वापरण्याच्या वस्तू जळून खाक झाल्या. आगीने रौद्ररूप धारण केले. सिलिंडरचा स्फोटाने घराचे दरवाजे, खिडक्या, तावदाने फुटली. सहा महिन्यापूर्वी नवीन घेतलेली एक दुचाकी आगीत भस्मसात झाली.
शेजारी राहणाऱ्या कुटुंबांनी घरातील साठवण टाकीतील पाणी बादल्यांनी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. महावितरण कंपनीने तत्काळ वीजपुरवठा खंडित केला. देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.