पैशाच्या लुटीसाठीच गौतम हिरण यांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:25+5:302021-03-14T04:20:25+5:30
श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर ...
श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण या व्यापाऱ्याच्या अपहरण आणि हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आले. हिरण यांच्या एका जुन्या कामगाराने हा कट रचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी सिन्नर (जि. नाशिक) येथून पाच आरोपींना अटक केली आहे. हिरण यांचे अपहरण पैशाच्या लुटीसाठी करण्यात आले असे तपासात निष्पन्न झाले.
अपहरण करण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संदीप मुरलीधर हांडे (वय २६, माळेगाव, ता.सिन्नर), जुनेद ऊर्फ जावेद बाबू शेख (२५, रा. सप्तशृंगीनगर, नायगाव रोड, सिन्नर), अजय राजू चव्हाण (२६, पास्तेगाव, मारुती मंदिरासमोर, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (२९, रा. उक्कडगाव, ता. कोपरगाव) व एक २२ वर्षीय आरोपी यांचा समावेश आहे.
आरोपींकडून हिरण यांचा मोबाइल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन (एम.एच.-१५,जी.एल. ४३८७) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी शनिवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे याबाबाबत माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, नगर येथील गुन्हे शाखेचे अनिल कटके, निरीक्षक संजय सानप यावेळी उपस्थित होते.
काही वर्षांपूर्वी हिरण यांच्याकडे एक व्यक्ती व त्याचा मुलगा दोघेही कामाला होते. यातील या मुलाने अपहरण व हत्येचा कट रचला. त्याने गाडी बंद पडल्याचा बहाणा करून हिरण यांची मदत मागितली. एका दुकानदाराकडून गाडी दुरुस्तीचे साहित्य घेऊन हिरण या कामगाराच्या सोबत एका दुचाकीवर गेले. तेथूनच अन्य साथीदारांच्या मदतीने अपहरण करण्यात आले. यावेळी हिरण यांच्याकडे १ लाख ६४ हजार रुपये होते. हिरण यातील एका आरोपीला ओळख होते. त्यामुळे आरोपींनी हिरण यांची हत्या करण्याचा नंतर निर्णय घेतला. पोलिसांनी या प्रकरणी अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी सागर गंगावणे व बिट्टू वायकर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यांनी शहरातील काही व्यापाऱ्यांकडे पैसे मागण्याचे प्रयत्न केले होते. त्यांना पैशांची गरज होती. दोघाही आरोपींविरुद्ध काही पुरावे आहेत. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींशी गंगावणे व वायकर यांचे संबंध पोलीस तपासणार आहेत, अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली.
गुन्ह्यातील काही आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. आणखी काही आरोपी निष्पन्न होतील. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे. हिरण यांच्याकडे अपहरण झाले त्यावेळी एक लाख ६४ हजार रुपयांची रक्कम होती. हिरण यांची हत्या मारुती व्हॅनमध्येच करण्यात आली होती. त्यानंतर मृतदेह एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गालगत आणून टाकण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.
...
असा झाला गुन्ह्याचा उलगडा
अपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हॅनमधून संशयास्पदरीत्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी अनेक व्हॅनचा शोध घेतला. त्यावरून नाशिक येथील व्हॅन मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. त्यामुळे संशय बळावल्यानंतर काही तासांमध्ये सर्व आरोपींना पकडले. या गाडीत हिरण यांच्या मोबाइलसह बँकेचे चेकबुक व पावत्या सापडल्या. त्याचबरोबर आरोपींपैकी एकाने मोठी चूक केल्याने पोलिसांना फायदा मिळाला. मात्र, त्याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही.
--------------
आरोपी बेसावध झाले
हिरण यांच्या हत्याकांडात गंगावणे व वायकर या दोन आरोपींना अटक झाल्याने मूळ गुन्हेगार बेसावध राहिले. त्याचा पोलिसांना लाभ मिळाला व त्यांच्यापर्यंत पोहोचता आले. गुन्हेगारांनी दहा ते पंधरा दिवस बेलापूर येथे रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. अपहरण केल्यानंतर पसार होण्याचे मार्ग शोधण्यात आले. तसेच अपहरणासाठी मारुती व्हॅनसोबतच अन्य एक गाडी वापरण्यात आली होती. मात्र, त्याबाबत तपास सुरू आहे, असे पाटील म्हणाले.
--------