गवार, शेवगा पोहोचला शंभरी पार; भेंडी, कारल्यानेही खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 04:51 PM2020-01-25T16:51:04+5:302020-01-25T16:52:09+5:30
कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे.
अहमदनगर : कांद्यापाठोपाठ गवार, शेवग्याच्या शेंगांनीही प्रतिकिलोला शंभरी ओलांडली आहे. भेंडी ८० रूपये, तर चांगल्या प्रतिचा बटाटाही ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे.
हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे मंडई, बाजारात काही मोजक्याच भाजीपाल्याची आवक वाढली. यामध्ये टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लावर, ढोबळी मिरची आदींचा समावेश आहे. हा भाजीपाला काहीसा रास्त भावात मिळतोय. मात्र गवार, शेवग्याच्या शेंगांची आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे या दोन्ही भाज्यांसाठी प्रतिकिलोला १०० ते १२० रूपये मोजावे लागत आहेत. त्यातच बटाटाही गेल्या महिनाभरापासून ३० ते ४० रूपये किलोने खरेदी करावा लागत आहे. याशिवाय भेंडी, कारले, दोडका, वटाणा, आदींनीही भाव खाल्ला आहे. कांद्याची आवक वाढली असली तरी त्याच्या भावात फारसा फरक पडलेला नाही. कांदाही ५० ते ६० रूपये किलोच्या दराने खरेदी करावा लागत आहे.
भाजीपाल्याचा दर असे..(रूपये प्रतिकिलो)
शेवगा, गवार- १००-१२०, आले, भेंडी, दोडका- ८०-१००, बिन्स, कारले, वटाणा- ५०-६०, ढोबळी मिरची, वांगी, फ्लावर, कोबी, डिंगरी-४०-५०, बटाटे, मिरची- ३०-४०, टोमॅटो, गाजर- २०-३०. मेथी, पालक, कोथिंबीर जुडी-१० रूपये.
गेल्या काही दिवसांपासून वारंवार बदलणा-या हवामानाचा भाजीपाल्याच्या पिकांवर परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेवगा, गवारीला बसला आहे. शेवग्याला पुरेसी फुलेच न लागल्याने त्याचे उत्पादन घटले तर गवारीवरही रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे बाजारात या दोन्ही पिकांची आवक अत्यंत कमी आहे, असे श्रीगोंदा येथील शेतकरी संदीप शिंदे यांनी सांगितले.