जर्सी गायीच्या पोटी गीर कालवडीचा जन्म; शेतकऱ्यांच्या गोठ्यात देशी गाय भ्रूण प्रत्यारोपण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:08 AM2022-08-07T07:08:37+5:302022-08-07T07:08:52+5:30
ऐतिहासिक संशोधन
राहुरी (जि. अहमदनगर) : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून संकरित (जर्सी) गायीच्या पोटी गीर जातीच्या कालवडीचा जन्म घडवून आणण्यात यश आले आहे.
या तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून राहुरी येथील गो संशोधन व विकास प्रकल्पात झाला.
कालवडीचे वजन २२.९ किलो असून, वळूमातेचे एका जोप्याचे दूध ४,१६५ लिटर व फॅट ५ टक्के आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली. महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरुवात केली आहे.या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे, अशी माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे उत्कृष्ट अनुवांशिकता असलेल्या दाता गायीपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगली अनुवांशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलित अंडाची सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळविले जाते.