पुण्यातील मारेकरी आणून गिरे यांची हत्या; मुख्य सूत्रधारासह दोघे अद्याप फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 01:21 PM2020-03-20T13:21:10+5:302020-03-20T13:21:57+5:30
शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांची हत्या मुख्य सूत्रधार रवी शेटे व त्याच्या साथीदारांनी पुण्यातील मारेकरी आणून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी चौघांना अटक केली. अद्याप मुख्य सूत्रधार रवि शेटे, विजू खर्डे हे फरारच आहेत.
अहमदनगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांची हत्या मुख्य सूत्रधार रवी शेटे व त्याच्या साथीदारांनी पुण्यातील मारेकरी आणून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी चौघांना अटक केली. अद्याप मुख्य सूत्रधार रवि शेटे, विजू खर्डे हे फरारच आहेत.
सुरेश गिरे यांची रविवारी (दि.१५) राहत्या घरी भोजडे (ता. कोपरगाव) येथे गोळ्या घालून हत्या झाली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलीस ठाण्यात आरोपी रवि अप्पासाहेब शेटे, विजू खर्डे (दोघेही रा. संवत्सर, ता. कोपरगाव) व अनोळखी ४ अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. रवी शेटे व मयत सुरेश गिरे यांच्या वैमनस्यातून अनेकदा भांडणे झाली. त्यामुळे एकमेकांविरूद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सन २०१२मध्ये रवि शेटे व त्याच्या साथीदारांनी सुरेश गिरे यांचा मित्र बंटी उर्फ विरेश पुंजाहरी शिनगर याचा खून केला. या गुन्ह्यात रवी शेटे व त्याच्या इतर साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. यात शेटे याचे दोन भाऊ जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु तेव्हापासून रवी शेटे फरार होता. १५ मार्च रोजी शेटे व त्याच्या साथीदारांनी गिरे यांच्या घरी जाऊन पिस्तुलातून गोळ्या झाडत, तसेच कोयत्याने वार करून गिरे यांची हत्या केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मुख्य आरोपी शेटे याने १५ दिवसांपूर्वीच तळेगाव (जि. पुणे) येथून भाडोत्री मारेकरी आणून हत्येचा नियोजनबद्ध कट केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सखोल तपास केला असता यात नितीन सुधाकर अवचिते (रा. तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे), शरद मुरलीधर साळवे (रा. काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड, पुणे, मूळ रा. गारखेडा, जि. औरंगाबाद), रामदास माधव वलटे (रा. लौकी, ता. कोपरगाव), आकाश मोहन गिरी (रा. खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांची माहिती मिळाली. त्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. यातील आरोपी अवचिते यावर ६ व साळवे यावर ३ गुन्हे पुणे जिल्ह्यात दाखल आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.