वेदना, भीतीवर समुपदेशनाची हळुवार फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:00+5:302021-05-30T04:18:00+5:30
शिर्डी : दादा कसे आहात, ताई काय म्हणते तब्येत, काय त्रास होतो, जेवण केले का, औषधे घेतली का, घरचे ...
शिर्डी : दादा कसे आहात, ताई काय म्हणते तब्येत, काय त्रास होतो, जेवण केले का, औषधे घेतली का, घरचे कसे आहेत, मनात काही शंका नाहीत ना, असतील तर नक्की सांगा, आपण त्यातून मार्ग काढू, आणि हो अजिबात काळजी करू नका, तुम्ही लवकरच ठणठणीत बरे होऊन आपल्या कुटुंबासमवेत असणार आहात, हे आम्ही अनुभवातून व खात्रीने सांगतो आहोत, अशा आश्वासक शब्दात विचारपूस करून कोरोना रुग्णांच्या वेदनेवर, भीतीवर समुपदेशनाद्वारे हळुवार फुंकर मारण्याचे कार्य राहाता व कोपरगाव तालुक्यात दिलासाकडून सुरू आहे.
प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यात तहसीलदार कुंदन हिरे यांच्या पुढाकारातून बीडीओ समर्थ शेवाळे, शिक्षणाधिकारी पोपट शिंदे, ज्ञानेश्वर वाकचौरे आदींनी तालुक्यातील निवडक बारा शिक्षकांना घेऊन हा उपक्रम सुरू केला. समुपदेशनाच्या माध्यमातून रुग्णांच्या मनातील भीती घालवण्यासाठी व दिलासा देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. १३ एप्रिल रोजी राहाता तालुक्यात सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे आजवर पाच हजार रुग्णांशी मोबाइलद्वारे संवाद साधण्यात आला. रुग्णांना होणारा फायदा लक्षात घेऊन प्रांताधिकारी शिंदे यांनी या उपक्रमाचा विस्तार कोपरगाव तालुक्यातही केला. तेथे तहसीलदार योगश चंद्रे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी काळे यांनी दहा शिक्षकांच्या मदतीने समुपदेशनाचे काम सुरू केलेले आहे. ६ मे पासून या माध्यमातून ७०० रुग्णांशी संवाद साधण्यात आला.
................
दोन्ही तालुक्यातील शिक्षकांना शिर्डीचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ओंकार जोशी यांनी समुपदेशन व संवादाचे प्रशिक्षण दिले. दिलासाद्वारे रुग्णांचे केवळ समुपदेशनच केले जात नाही तर संवादातून रुग्णांच्या वैयक्तिक अडचणी, दु:ख, कुचंबना, सेंटरवरील गैरसोयी समोर येतात. ग्रुपवर याची माहिती मिळताच राहात्यात तहसीलदार हिरे, बीडीओ शेवाळे तत्काळ त्यावर एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे उपाययोजना करतात. कोपरगावातही हा उपक्रम सुरू आहे. असंख्य रुग्ण या उपक्रमाला व प्रशासनाला धन्यवाद देत आहेत, काहीजणांनी तर समुपदेशानामुळे आमची भीती कमी झाली, आम्ही पुन्हा आमच्या माणसात येऊ शकलो या शब्दात ऋतज्ञता व्यक्त करत आहेत. राहात्यात नामदेव मोकळ तर कोपरगावात बाबासाहेब काळे हे अन्य शिक्षकांशी समन्वय ठेवत आहेत.
- गोविंद शिंदे, प्रांताधिकारी