नगरसाठी अकादमी काढायचीय
By Admin | Published: May 14, 2014 11:15 PM2014-05-14T23:15:44+5:302024-09-30T12:14:28+5:30
अहमदनगर : मराठमोळी अभिनेत्री म्हणून श्रीरामपूरची रूपाली कृष्णराव फोपसे पाटील ही नावारूपाला येते आहे.
अहमदनगर : मराठमोळी अभिनेत्री म्हणून श्रीरामपूरची रूपाली कृष्णराव फोपसे पाटील ही नावारूपाला येते आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या कोयलांचल या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. तिने नगरी कलाकारांसाठी सिने अकादमी सुरू करण्याचा संकल्प सोडलाय. नगरमधील पत्रकारांशी गप्पा मारताना तिने आपल्या करिअरचा ग्राफ उलगडून दाखवला. यावेळी तिचे वडील कृष्णराव फोपसे पाटील, कास्टिंग डिरेक्टर खालिद पठाण उपस्थित होते. गेल्याच आठवड्यात तिची मध्यवर्ती भूमिका असलेला कोयलांचल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात विनोद खन्ना, सुनील शेट्टी असताना रूपालीच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक होत आहे. काही समीक्षकांनी ती शर्मिला टागोर असल्याचा दाखला दिला आहे. या चित्रपटात तिची भूमिका कसदार असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. रूपालीला मात्र, स्मिता पाटीलसारखी कामगिरी करून दाखवायची आहे. तिने झुंज, मिशन दोस्ती डॉट कॉम, पवित्र रिश्ता, सियासत, सीटीझन, रामा,शिवा, गोविंदा आदी चित्रपट, मालिकांत भूमिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाचा प्रवास सांगताना रूपाली म्हणाली, ग्रामीण भागात अनेक गुणी कलाकार आहेत. परंतु त्यांना एकतर संधी मिळत नाही आणि त्यांना पैलू पाडण्यासाठी रत्नपारखी नसतो. या क्षेत्रात थोडी स्थिरस्थावर झाल्यावर नगरच्या कलाकारांसाठी अकादमी सुरू करण्याचा मानस आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. कोणत्याही क्षेत्रात जाऊन काम करणे अशक्य नसते. जिद्द आणि परिश्रमाची तयारी ठेवली तर आपण यशापर्यंत नक्की पोहोचतो. मात्र, त्यासाठी ग्रामीणतेचा न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. तो जर मनात ठेवला तर तुम्हाला पावलोपावली अपयश येईल. हे मी अनुभवातून सांगत असल्याचे रूपाली सांगते. कृष्णराव फोफसे पाटील हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. पोलीस खात्यातील कामगिरीबद्दल त्यांचे पुरस्कारासाठीही मानांकन झाले होते. त्यांना आपल्या मुलीने शिक्षक व्हावे अशी अपेक्षा होती. पण ती झाली अभिनेत्री. आता मात्र, ते रूपालीच्या यशावर खुश आहेत. स्वप्न पाहा, ती पूर्ण होतात. फक्त त्यासाठी थोडे कष्ट करावे लागतात, असा नवख्या कलाकारांसाठी रूपालीचा सल्ला आहे. (प्रतिनिधी)