पन्नास हजारांत घ्या... बोगस डिग्रीचे प्रमाणपत्र, रॅकेट उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 07:26 AM2023-07-16T07:26:25+5:302023-07-16T07:32:06+5:30
दहावी, बारावीसह पदवीच्या बनावट प्रमाणपत्रांची ५० ते ६० हजारांना विक्री करणारे रॅकेट तोफखाना पोलिसांनी उघड केले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : दहावी, बारावीच्या बनावट गुणपत्रिका विक्रीप्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या बालिकाश्रम राेडवरील रुद्र एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल १८० बनावट प्रमाणपत्रे पाेलिसांच्या हाती आली आहेत. यामध्ये दहावी, बारावीच्या गुणपत्रिकांसह बीएएमएस, बीएचएमएस, डीएमएलटी कोर्सच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.
दहावी, बारावीसह पदवीच्या बनावट प्रमाणपत्रांची ५० ते ६० हजारांना विक्री करणारे रॅकेट तोफखाना पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी अशोक नामदेव सोनवणे (वय ३७, रा. द्वारकाधीश वसाहत, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याच्या नावे आलेल्या कुरिअरमध्ये चार बनावट गुणपत्रिका आढळून आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या रुद्र एज्युकेशन इन्स्टिट्यूटवर छापा मारला. त्यावेळी त्यांना दहावी, बारावीसह विविध शाखांच्या पदव्यांची १८० बनावट प्रमाणपत्रे आढळली.
धुळ्यातून दिल्लीच्या संपर्कात
आरोपी सोनवणे हा २०१७ मध्ये धुळ्यात पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत कौशल्य विकास केंद्र चालवीत होता. यानिमित्ताने त्याचा दिल्ली येथील बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांशी संपर्क आला. दिल्लीहून कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे बनावट प्रमाणपत्र मागवून तो विकत होता. यातून त्याला झटपट पैसे कमविण्याचा मार्ग सापडला.