पालिका ताब्यात घेण्यासाठी महाजन पैशाच्या बॅगा घेऊन फिरताहेत - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 07:08 PM2019-01-31T19:08:09+5:302019-01-31T19:08:28+5:30
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पैशाच्या बॅगा घेऊन फिरत आहेत.
श्रीगोंदा : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे पैशाच्या बॅगा घेऊन फिरत आहेत. ते श्रीगोंद्यातही पैशाच्या बॅगा घेऊन आले होते. पण दोन्ही काँग्रेसपुढे त्यांचा टिकाव लागला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाजन यांच्यावर करत श्रीगोंदा नगरपालिकेतील विजय हा आघाडीतील एकसंघपणा असल्याचे सांगितले.
श्रीगोंदा येथे नगराध्यक्षा शुभांगी पोटे व आघाडीतील नगरसेवकांचा सन्मान जयंत पाटील यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते.
पाटील म्हणाले, मोदी सरकारने सीबीआयचे वाटोळे केले. आता इतिहासची पदवी असलेल्या तज्ञाची रिझर्व्ह बँंकेच्या गव्हर्नर पदी नेमणुक केली आहे. आता रिझर्व्ह बँकेचे वाटोळे सरकार करणार आहे. राज्यातील महामंडळांनी निधी दिल्याची घोषणा सरकारने केली पण नगर जिल्ह्यातील धरणासाठी शिर्डी संस्थानकडून ५०० कोटी घेण्याची वेळ सरकारवर आली. त्यामुळे देशात आणि राज्यात परिवर्तन होईल असा विश्वास
पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे राजेंद्र नागवड, नगराध्यक्ष मनोहर पोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर यांची भाषणे झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, राजू गोर, असिफभाई इनामदार, सतिश कसरे, आदेश नागवडे, गौतम घोडके, चंदू वाजे, शरद जमदाडे, संजय निगडे उपस्थित होते.
तर आमदार जगतापच
श्रीगोंद्यात राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडी केली. नगरपालिका ताब्यात घेतली. व्यासपीठावरील नेते असेच एकत्र राहीले तर श्रीगोंद्याचे आमदार हे राहुल जगताप हेच होतील, असेही पाटील म्हणाले.