तुकाई चारीसाठी कर्जत तहसीलसमोर घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:51 PM2018-03-06T17:51:39+5:302018-03-06T17:52:42+5:30
कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कर्जत : एका गावासाठी अंगावर रॉकेल ओतून घेणारे पालकमंत्री २१ गावांना वरदान ठरणार असलेल्या तुकाई चारीच्या प्रश्नावर गप्प का बसले आहेत? याचा विचार जनतेने करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी येथे बोलताना केले. कर्जत तहसील कार्यालयासमोर बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल तुकाई चारी कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील सुर्यवंशी, सतिष लाघुडे, सतिष पाटील, मिलिंद बागल, रामदास सूर्यवंशी, भा.को. साळवे, आंदोलक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी व कुकडीचे आधिकारी व तहसीलदार किरण सावंत पाटील यावेळी उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील २१ गावांना वरदान ठरणारी तुकाई चारी योजना व्हावी, या एक वर्षापासून बाळासाहेब त्रिंबक सूर्यवंशी हे आत्मक्लेश आंदोलन कर्जत तहसीलदार कार्यालयापुढे करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास २१ गावातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला यांचा आंदोलनास पाठिंबा आहे. या सर्वाच्या वतीने मंगळवारी येथे येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी किरण पाटील, सुनील टकले, रामा तनपुरे, बाळासाहेब सूर्यवंशी, सतिष लाघुडे, रामदास सूर्यवंशी,भगवान घोडके, कमलाकर शेटे, बबन दळवी, सलीम आतार यांची भाषणे झाली.