घाटघरला विक्रमी १५ इंच पाऊस

By Admin | Published: July 11, 2016 12:33 AM2016-07-11T00:33:54+5:302016-07-11T00:51:52+5:30

राहुरी/राजूर : अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडीसह भंडारदरा पाणलोटात व मुळा खोऱ्यातील हरिचंद्रगड परिसराला रविवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला.

The Ghatghar records a record rainfall of 15 inches | घाटघरला विक्रमी १५ इंच पाऊस

घाटघरला विक्रमी १५ इंच पाऊस

राहुरी/राजूर : अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडीसह भंडारदरा पाणलोटात व मुळा खोऱ्यातील हरिचंद्रगड परिसराला रविवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. घाटघर येथे तब्बल १५ इंच पाऊस कोसळल्याने मुळा नदीला मोठा पूर आला आहे. तर भंडारदरा येथे दिवसभरातील १२ तासांत सव्वा पाचइंच पाऊस बरसला. त्यामुळे भंडारदरा धरणात अवघ्या बारा तासांत ९२१ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत धरणातील साठा सव्वाचार टीएमसीपर्यंत (३९ टक्के) पोहोचला. मुळा नदीतून दुपारी ५६ हजार क्युसेकने आवक सुरू असल्याने मुळा धरणाचा साठा सायंकाळी ७ हजार ७०० दशलक्ष घनफूट (३० टक्के) झाला होता. या दोन्ही धरणांच्या पाणलोटातील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते.
धरणांच्या पाणलोटात शनिवारपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत होत्या. मध्यरात्रीनंतर मात्र पावसाचे तांडवच या परिसरात सुरु झाले. नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर येथे २४ तासांत या मोसमातील सर्वाधिक म्हणजेच ३६० मि.मी. पाऊस बरसला तर त्या खालोखाल रतनवाडी येथे सुमारे सव्वा बारा इंच म्हणजेच ३१५ मि.मी. पाऊस झाला. परिसरातील लहान मोठ्या ओढ्या-नाल्यांना पुराचे स्वरूप आले असून सर्व परिसर जलमय झाला आहे.
शिखरस्वामिनी कळसूबाईच्या डोंगररांगांतही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कृष्णावंती या प्रवरेच्या उपनदीसही पूर आला आहे. वाकी येथील लघुपाटबंधारे प्रकल्पावरून सायंकाळी सहा वाजता ३६०० क्युसेकहून अधिक वेगाने पाणी या नदीपात्रात पडत होते. पर्यटकांचे मानबिंदू असलेला रंधा धबधबा रौद्ररूप धारण करू लागला आहे, यामुळे निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक झपाट्याने होत असून या धरणातील पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता १ हजार ३०७ द.ल.घ.फू. इतका झाला होता.
राजूर परिसरातही दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्यामुळे ओढे नाले आता वेगाने वाहू लागले आहेत.त्यामुळे तरारून आलेली भात रोपेही पाण्याखाली गेली आहेत. फोपसंडी घाटात रात्री दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती, तर मुळा खोऱ्यातही पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
रविवारी दिवसभरात संपलेल्या २४ तासांत नोंदला गेलेला पाऊस पुढीलप्रमाणे: पांजरे १६२ मि.मी, वाकी १४२ मि.मी, अकोले ८३ मि.मी, निळवंडे ४४ मि.मी, कोतूळ ३३ मि.मी.
पर्यटकांचा ओघ सुरू
दोन दिवसातं झालेल्या दमदार पावसामुळे आता पर्यटकांची पावले भंडारदरा परिसराकडे वळू लागली आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने रंधा फॉल, तसेच भंडारदरा परिसरात पर्यटकांनी गर्दी गेली होती. पावसाच्या आनंदाने रस्त्याच्या कडेल्या पर्यटक थिरकताना आढळली.

Web Title: The Ghatghar records a record rainfall of 15 inches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.