२७ मार्च, १० मे रोजी मिळणार घोड कालव्याचे आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:47+5:302021-03-27T04:21:47+5:30
काष्टी : घोड कालव्याचे उन्हाळी आवर्तन २७ मार्च व १० मे रोजी सोडण्याचे शुक्रवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या ...
काष्टी : घोड कालव्याचे उन्हाळी आवर्तन २७ मार्च व १० मे रोजी सोडण्याचे शुक्रवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. लाभधारक शेतकऱ्यांकडे थकीत पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. ही पाणीपट्टी भरल्याशिवाय वितरिका सोडल्या जाणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
थकबाकी वसुलीबाबत व उन्हाळी आवर्तनाचे योग्य नियोजन करण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत शुक्रवारी काष्टी विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहामध्ये जलसंपदा विभागाचे अधिकारी व पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली.
पाचपुते म्हणाले, ‘‘प्रत्येकाला पाणी मिळाले पाहिजे. हा जसा प्रत्येक लाभधारकाचा हक्क आहे. तसेच पाणीपट्टीही वेळेवर भरली पाहिजे. याचा मात्र सोयीस्कर विसर होतो.’’ यापुढे पाणीपट्टी न भरणाऱ्यांना पाणी मिळणार नाही, असा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन्ही आवर्तनासाठी एकरी पाचशे रुपयांप्रमाणे पाणीपट्टी जलसंपदाच्या कार्यालयाकडे किंवा पाणी वापर संस्थेकडे जमा करावी, असे आवाहन पाचपुते यांनी केले.
प्रास्ताविक काष्टीचे शाखा अभियंता दिलीप डफळ यांनी केले. त्याचप्रमाणे भगवानराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, सुनील जंगले, अनिल पाचपुते, संदीप पाचपुते, राजेंद्र नागवडे, तुकाराम शिपलकर, भास्कर जगताप, डॉ. डी. एस. नागवडे यांनी चर्चेत भाग घेतला. रावसाहेब पंधरकर यांनी आभार मानले.