सुपा ग्रामविकास शिक्षण संस्थेत अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:55+5:302020-12-30T04:27:55+5:30
सुपा : ग्रामविकास शिक्षण संस्थेत बनावट पावती पुस्तक व शिक्के तयार करून त्याद्वारे पैसे गोळा करून त्या पैशाचा स्वतःच्या ...
सुपा : ग्रामविकास शिक्षण संस्थेत बनावट पावती पुस्तक व शिक्के तयार करून त्याद्वारे पैसे गोळा करून त्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. या फसवणूक प्रकरणी संस्थेने सुपा पोलीस स्टेशनला विलास माधव पाटील (रा. सावेडी, अहमदनगर) यांच्या विरोधात फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, विलास माधव पाटील हे ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. ते कार्यकारी मंडळाच्या सभांना सतत गैरहजर राहत होते. त्यांनी संस्थेच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून व शिक्के तयार करून १ ते ७३ पावत्यांवरील रक्कम संस्थेच्या बँक खात्यावर जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे. अशी फिर्याद जनार्दन शिवाजी लिपणे (रा. रांजणी, ता. जि. नगर) यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिली आहे.
ग्रामविकास शिक्षण संस्थेची रुईछत्रपती, निंबवी, दरोडी अशा तीन ठिकाणी मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. या संस्थेतील रूई व दरोडी या शाळा पारनेर तालुक्यात तर निंबवी ही श्रीगोंदा तालुक्यातील शाळा आहे. सुरुवातीला मुकुंदराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बरीच वर्षे कार्यकारी मंडळ कार्यभार पाहत होते. त्यानंतर एम. पी. शिर्के यांच्या ताब्यात ही संस्था आली. सध्या कार्यरत असणाऱ्या कार्यकारी मंडळात अधिकार नसताना पाटील याने रक्कम गोळा करून अपहार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे करीत आहेत.