शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीतील मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 05:45 PM2018-06-16T17:45:12+5:302018-06-16T17:46:38+5:30
शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीत प्रवेश घेतलेल्या रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिरानजीक,जामखेड) या विद्यार्थिनीने घरातच ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.
जामखेड : शाळेच्या पहिल्याच दिवशी दहावीत प्रवेश घेतलेल्या रेणुका राम काकडे (वय १६, रा.विठ्ठल मंदिरानजीक,जामखेड) या विद्यार्थिनीने घरातच ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.
रेणुका नववी असताना कळंब (जि. उस्मानाबाद) येथे मामाच्या गावी शिकत होती. मात्र दहावीला ती पुन्हा जामखेड येथे आई, वडीलांकडे पुढील शिक्षणासाठी आली होती. १ जुन पासून तिने जामखेड शहरातील कन्या विद्यालयात प्रवेश घेतला होता. दहावीच्या नियमित जादा तासालाही ती जात होती. त्यावेळी तिने शाळेत दाखला न दिल्याने तीला दाखला घेऊन ये, तुझा प्रवेश निश्चित केला आहे असे सांगण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी शाळेचा पहिला दिवस होता. मात्र ती शाळेत गेली नव्हती. दुपारी दोनच्या सुमारास रेणुका हीने रहात्या घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी स्वत:ची रुग्णवाहिका घेउन घटनास्थळी हजर झाले, परंतु तोपर्यंत रेणुका मयत झाली होती. कोठारी यांनी रेणुका हिचा मृतदेह जामखेड ग्रामिण रूग्णालयात नेला. वैद्यकीय अधिक्षक युवराज खराडे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. जामखेड पोलीसानी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढिल तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल बापू गव्हाणे करीत आहेत.