नियमित कर भरणाऱ्यांना ७५ टक्के सवलत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:39+5:302021-02-27T04:27:39+5:30
अहमदनगर : महापालिकेने थकबाकीदारांना शास्तीत ७५ टक्के इतकी सवलत दिली असून, शहरातील नियमित कर भरणाऱ्यांना कर वसुलीत ७५ टक्के ...
अहमदनगर : महापालिकेने थकबाकीदारांना शास्तीत ७५ टक्के इतकी सवलत दिली असून, शहरातील नियमित कर भरणाऱ्यांना कर वसुलीत ७५ टक्के सवलत द्यावी, अशी मागणी केडगाव येथील जागरूक मंचाने महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळावा, यासाठी महापालिकेने शास्तीवर ७५ टक्के माफीची योजना मध्यंतरी राबविली. या योजनेला प्रतिसादही मिळाला. कर थकवणाऱ्यांना पालिकेने सवलत दिली, तशी सवलत नियमित कर भरणाऱ्यांनाही द्यावी, अशा मागणीचे निवेदन केडगाव येथील जागरूक मंचच्या वतीने महापौर वाकळे यांना देण्यात आले आहे. शहर व उपनगरातील रस्ते महापालिकेने दुरुस्तीसाठी खोदून ठेवले आहेत. मात्र, दुरुस्ती होत नसल्याने सर्वत्र धूळ उडत आहे. याकडेही ज्येष्ठ नागरिकांनी महापौरांचे लक्ष वेधले. अर्धवट रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील पथदिव्यांची कामे रखडलेली आहेत. सिग्नलही बंद पडलेले आहेत. ते दुरुस्त करावेत. कचरा संकलन करण्यासाठी वाहने वेळेवर येत नाहीत. याबाबतही नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. निवेदनावर विशाल पाचरणे, अंबिका कंकाळ, सुहास साळवे आदींची नावे आहेत.