रोहित पवार यांनाच उमेदवारी द्या : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:31 AM2019-07-10T11:31:41+5:302019-07-10T11:33:04+5:30
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून बारामती अॅग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.
कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून बारामती अॅग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.९) राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून रोहित पवार व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड हे दोनच उमेदवार इच्छुक आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे आहे. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जातील. मतदारसंघातील विविध प्रश्न व सक्षम विरोधकाचा विचार करता रोहित पवार यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हेच असतील हे निश्चित झाले आहे.
हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर रोहित पवार किंवा मंजुषा गुंड यापैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करायचा, असेही यावेळी ठरले. या जागेबाबत राज्य पातळीवरील नेते जो निर्णय घेतील तो मान्य करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी रोहित पवार, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, मनिषा जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश काळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे, उद्योजक दीपक शिंदे, अॅड. सुरेश शिंदे, कर्जत तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सपकाळ, थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे, जळकेवाडीचे सरपंच किरण पावणे, शिवाजीराव फाळके, माजी सभापती एकनाथ गांगर्डे, देविदास गोडसे, मारूती सायकर, बहिरोबावाडीचे उपसरपंच सचिन लाळगे, सचिन मांडगे, मधुकर घालमे, चमस थोरात आदी उपस्थित होते.