‘पंतप्रधान आवास’साठी शासकीय जमीन द्या : घरकुल वंचितांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:35 AM2018-07-31T11:35:44+5:302018-07-31T11:35:50+5:30
घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी नगर शहराजवळील नेप्ती ग्रामपंचायत हद्दीतील कांदा मार्केटलगत असलेली शासकीय पड जमीन मिळण्याची मागणी ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.
अहमदनगर : घरकुल वंचितांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविण्यासाठी नगर शहराजवळील नेप्ती ग्रामपंचायत हद्दीतील कांदा मार्केटलगत असलेली शासकीय पड जमीन मिळण्याची मागणी ‘मेरे देश मे मेरा अपना घर’ आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.
हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत घरकुल वंचितांनी घरकुल होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच पंतप्रधान आवास योजनेची घोषणा होऊन साडेतीन वर्षे उलटली तरी अद्याप वंचितांना घरे मिळाली नसल्याबाबत नाराजीही व्यक्त केली़ त्यामुळे पुढील निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अॅड. कारभारी गवळी यांनी दिला.
नेप्ती ग्रामपंचायत हद्दीत शासकीय २० ते २५ एकर खडकाळ जमीन पडीक आहे. या शासकीय जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प उभारून घरकुल वंचितांची घरे साकारली जाणार आहे. पंतप्रधान आवास जिल्हा समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे असून, त्यांनी पुढाकार घेतल्यास ही योजना यशस्वी होणार आहे. मागे घरकुल वंचितांनी पंम्पिंग स्टेशन येथील शेतकी खात्याची पड जमीन मिळण्याची मागणी केली होती. मात्र त्याला कृषी विभागाच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला. शासकीय पड जमिनीवर पंतप्रधान आवास योजना राबविण्याची भूमिका संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली असून, यासाठी संघटनेच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. या बैठकीप्रसंगी अॅड. गवळी, पास्टर अश्विन शेळके, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, शारदा भालेकर, अंबिका नागुल, सुचिता शेळके, अंबिका जाधव, लता पाडले, फरिदा शेख, नंदा मोरे, शारद गायकवाड, शांता खुडे, कांता साळवे, सविता बोरुडे, शारदा जंगम आदी उपस्थित होते.