साखर कारखान्यांचा ताळेबंद तपासूनच कर्ज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:58+5:302021-03-28T04:19:58+5:30
जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी बँकेच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी थोरात बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन ...
जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी बँकेच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी थोरात बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाईन झाली. इतर संचालक ऑनलाईन सहभागी झाले होते. बँकेच्या सभागृहात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, आमदार मोनिका राजळे, ज्येष्ठ संचालक भानुदास मुरकुटे, शिवाजी कर्डिले, गणपतराव सांगळे, करण ससाणे, अमोल राळेभात, आशा तापकीर, अमोल भांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, बाळासाहेब साळुंके, आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, जिल्हा बँक ही जिल्ह्यातील कारखाने, दूध संघ यांच्या विकासाची मातृत्व संस्था आहे. आतापर्यंत जुन्या-जाणत्या लोकांनी बँकेला जपले आहे. आता ही बँक अजून प्रगतिपथावर नेण्याची संचालक मंडळाची जबाबदारी आहे. गावोगावच्या विकास सोसायट्या शेतकऱ्यांचा आधार आहेत. त्यामुळे बँकेच्या माध्यमातून सोसायट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करा. बँकेच्या कामकाजासाठी मनुष्यबळ कमी पडत असेल तर त्याची व्यवस्था करा. आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक प्रशिक्षित करा, मात्र शेतकऱ्यांना चांगली सेवा द्या, असा सल्ला थोरात यांनी यावेळी दिला.
अध्यक्ष शेळके यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती दिली. वेळेवर कर्ज फेडणाऱ्या संस्थांना वाढीव एक टक्का रिबेट देण्याचा बँकेचा प्रयत्न राहणार आहे. बँक लवकरच सेवा सोसायट्यांचे काम संगणकीकृत करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. करण ससाणे यांनी अहवाल वाचन केले. सबाजी गायकवाड, सचिन गुजर यांनी विविध सूचना मांडल्या.
.....................
वीज बिलासाठी बँकेने शेतकऱ्यांना कर्ज द्यावे - तनपुरे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सुमारे पाच हजार कोटींची कृषिपंपांची थकबाकी आहे. सरकारने आत्ता सवलत दिली असून त्यानुसार केवळ सतराशे कोटी भरायचे आहेत. जिल्हा बँकेने जर शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज दिले तर त्यातून त्यांना कृषिपंपांचे वीज बिल भरता येईल आणि ते थकबाकीमुक्त होतील, अशी मागणी राज्यमंत्री तनपुरे यांनी केली. त्यावर ‘बँकेतील ताळेबंद पाहून विचार करू,’ असे आश्वासन अध्यक्ष शेळके यांनी दिले.