शेतकऱ्यांना पेन्शन द्या

By Admin | Published: August 8, 2014 12:20 AM2014-08-08T00:20:04+5:302014-08-08T00:23:07+5:30

वृध्द शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत करण्यात आला.

Give pensions to farmers | शेतकऱ्यांना पेन्शन द्या

शेतकऱ्यांना पेन्शन द्या

अहमदनगर : आयुष्यभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना उतारवयात अनेक व्याधी अथवा आजारांना सामोरे जावे लागते. काही शेतकऱ्यांना तर मुले सांभाळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. यामुळे राज्य सरकारने या वृध्द शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच जिल्ह्यात टंचाईच्या काळात चारा उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण योजना म्हणून मका बियाणांसाठी जिल्हा नियोजन समितीकडे ५० लाख रुपयांचा निधी मागण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभापती बाबासाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी आणि पशुसंवर्धन समितीची बैठक झाली. यात विशेष घटक योजनेसाठी अनुसूचित जाती-जमातीसाठीच्या शेतकऱ्यांचे ५०१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. योजनेसाठी १२ आॅगस्ट ही मुदत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. योजनेत नवीन विहिरीसाठी एक लाख रुपयांचा निधी आहे. बैलजोडी, पाईपलाईन, तुषार, सिंचन, आॅईल इंजिन आणि अन्य कृषी साहित्यासाठी ५० हजार रुपयापर्यंतचा लाभ मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना आदर्श गोपालक आणि प्रगतीशील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या १० ते १२ दिवसांत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात टंचाई परिस्थितीमुळे चारा उत्पादन वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत मका बियाणे मागणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात येणार आहे.
सभेला जयश्री दरेकर, सुनीता भांगरे, सुरेखा शेळके, शारदा भिंगारदिवे, सोनाली बोराटे, श्रीनिवास त्रिभुवन, मच्छिंद्र केकाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, प्रभारी कृषी विकास अधिकारी शंकपाळ आदी उपस्थित होते.
या आर्थिक वर्षापासून कृषी अभियांत्रिकी योजना राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. ७३ व्या घटना दुरूस्तीनुसार राज्य सरकारचा कृषी विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग होणे आवश्यक असताना, जिल्हा परिषदेची योजना काढून घेण्यात आली आहे. याबाबत शासनाला ठराव करून ही योजना पुन्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Give pensions to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.