मराठ्यांना आरक्षण द्या, निर्भयाला न्याय द्या; कोेपर्डी ग्रामस्थांची मागणी: गावात विद्यार्थिनींसह उपोषण
By अरुण वाघमोडे | Published: September 5, 2023 04:42 PM2023-09-05T16:42:13+5:302023-09-05T16:42:27+5:30
जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत गावातील भैरवनाथ मंदिरासमोर भजन-कीर्तन करीत साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कर्जत: ज्या ठिकाणातून राज्यभरात मराठा मोर्चांची ज्योत पेटली त्याच कोपर्डी येथे मंगळवारपासून (दि.५) ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी येथील निर्भयाच्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी द्यावी, आदी मागण्यांसाठी ग्रामस्थांनी उपोषणाला प्रारंभ केला असून यामध्ये गावातील शालेय विद्यार्थिनीही सहभागी झाल्या आहेत.
जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत गावातील भैरवनाथ मंदिरासमोर भजन-कीर्तन करीत साखळी उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाज अतिशय मागासलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी होत आहे. १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील निर्भया हत्याकांडानंतर मराठा समाज ३५० वर्षानंतर लाखोच्या संख्येने मोर्च्याच्या निमित्ताने एकत्र आला.
यावेळी सामाजाने आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडल्या. सरकारने मात्र, खोटी आश्वासने देत समाजाच्या तोंडाला पाने पुसली. अंतरवाली सराटी (जालना) येथे आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर लाठ्या चालविण्यात आल्या. यातील दोषींवर कारवाई करावी, कोपर्डी येथील निर्भया हत्याकांडातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी आदी ग्रामस्थांच्या मागण्या आहेत.