वंचित गावांना वांबोरी चारीचे पाणी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:59+5:302021-01-24T04:09:59+5:30
नेवासा : शेती सिंचनापासून वंचित असणाऱ्या नेवासा तालुक्यातील गावांना वांबोरी चारीत समाविष्ट करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मुंबई ...
नेवासा : शेती सिंचनापासून वंचित असणाऱ्या नेवासा तालुक्यातील गावांना वांबोरी चारीत समाविष्ट करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या दालनात शनिवारी बैठक झाली. वंचित गावांना वांबोरी चारीचे पाणी द्या, अशी मागणी यावेळी ‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी केली.
बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी, प्रहार जनशक्तीचे तालुका उपाध्यक्ष संजय वाघ, जिल्हा समन्वयक महादेव आव्हाड, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे, आदी उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे लाभक्षेत्रातील पांगरमल, राजेगाव, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, वाघवाडी, झापवाडी, लोहगाव, शिंगवे तुकाई अशी गावे जाणीवपूर्वक वगळली. वांबोरी चारी ते वाघवाडी शेती सिंचनासाठी असलेली पाईपलाईन तलाव क्रमांक ३८ आणि ३९ सुरू होण्यापूर्वीच नादुरुस्त असल्याचे सांगितले, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या.
यावर अधिकाऱ्यांनी १०२ तलावांत आणखी बंधारे किंवा तलाव जोडणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू अधिकाऱ्यांना म्हणाले, अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनेकडे बघावे. वांबोरी चारी पाईपलाईन योजनेच्या फुटबॉलची खोली कशी वाढवता येईल. धरणातील गाळ काढून जलसाठा वाढवता येईल का? त्याचे नियोजन करावे. मुळा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून वाया जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याचे काटेकोर नियोजन करा. मुळा धरण ओसंडून वाहत असताना या वंचित गावांचे बंधारे कसे भरता येतील हे पाहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.