नगरमध्ये काळ्याबाजारात नेताना रेशनचा ५ लाखांचा गहू पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:54 AM2018-01-10T11:54:46+5:302018-01-10T11:55:19+5:30
काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा रेशनचा ५ लाख रूपयांचा गहू कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील कायनेटिक चौकात जप्त केला.
अहमदनगर : काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा रेशनचा ५ लाख रूपयांचा गहू कोतवाली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील कायनेटिक चौकात जप्त केला. पोलिसांनी गहू घेऊन जात असलेल्या ट्रक चालकाला पकडले तेव्हा त्याच्याकडे नगर बाजार समितीचे बनावट लेटर सापडले. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक घनश्याम गवळी यांनी फिर्याद दाखल केली आहे.
रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती कोतवाली ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना समजली होती. माहितीनुसार शहरातील कायनेटिक चौकात पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, कॉन्स्टेबल दीपक गाडीलकर, सुमीत गवळी, प्रभाकर भांबरकर, बंडू भागवत, रवींद्र टकले यांनी सापळा लावून गव्हाच्या ट्रकसह चालक भाऊसाहेब गोरख पोकळे (वय ३० रा. अंमळनेर ता. पाटोदा जि. बीड) याला ताब्यात घेतल. यावेळी ट्रकमध्ये पांढ-या रंगाच्या गोण्यामध्ये भरलेला ९ हजार ५०० किलो गहू आढळून आला. पथकाने पोकळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नगर बाजार समितीतून हा गहू खरेदी केला असल्याचे सांगत पथकाला बिल व समितीचे लेटर दाखविले. हे लेटर बनावट असल्याचा संशय आल्याने पथकाने बाजार समितीकडे याची चौकशी केली असता ते लेटर त्यावरील शिक्के व बिल बनावट असल्याचे समोर आले. याबाबत पोलिसांनी पुरवठा विभागाला माहिती दिल्यानंतर माळीवाडा विभागाचे पुरवठा निरीक्षक गवळी यांनी पोकळे याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
रेशनचा गहू साध्या गोण्यात
रेशनचा गहू साध्या पांढ-या रंगाच्या गोण्यात भरून तो सुपा येथील विक्रीसाठी नेण्यात येत होता. हा गहू पाटोदा व अंमळनेर परिसरातून आणल्याचे समजते. याबाबत कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत. रेशनचा गहू विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असून, यामध्ये बरेच जण सहभागी आहेत. सुपा येथील एका मिलमध्ये हा माल विकला जातो. सुपा येथे गहू खरेदी करणारे कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.