विखे राजकीय चक्रव्यूहात
By सुधीर लंके | Published: March 10, 2019 09:50 AM2019-03-10T09:50:23+5:302019-03-10T09:53:27+5:30
सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे राधाकृष्ण विखे यांचेच राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. राष्टÑवादीने त्यांची कोंडी केली आहे.
सुधीर लंके
अहमदनगर : सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे राधाकृष्ण विखे यांचेच राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. राष्टÑवादीने त्यांची कोंडी केली आहे. काँग्रेसमध्ये थांबणेही अडचणीचे व भाजपमध्ये जाणेही जोखमीचे अशा पेचात ते अडकले आहेत. कुठेही गेले तरी त्यांच्या विश्वासर्हतेबाबत आता शंका घेतल्या जातील.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे हे दोघेही राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत. विखे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा पुुन्हा सुरु झाली आहे. मात्र, भाजपमध्ये प्रवेश करणे किंवा कॉंग्रेसमध्येच थांबणे या दोन्ही बाजूने विखेंसमोर आता अडचणी आहेत. त्यांचे राजकीय भवितव्यच एकप्रकारे पणाला लागले आहे.
आपण खासदारकीची निवडणूक लढविणार हे सुजय विखे गत दोन वर्षांपासून सांगत आहेत. ‘पक्ष व चिन्ह कुठले हे नंतर सांगू. प्रसंगी कॉंग्रेस सोडू पण निवडणूक लढू’ असेही सुजय बोलत होते. त्यांची ही विधाने राजकीय पक्षांनी यापूर्वी गांभीर्याने घेतली नाहीत. स्वत: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही या विधानांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. दबाव निर्माण झाला तर त्यांना ते बहुधा हवेच होते. आज मात्र पुत्राच्या आग्रही भूमिकेमुळे त्यांच्यासमोरही पेच निर्माण झाला आहे.
राष्टÑवादीचे नेते अहमदनगरची जागा कॉंग्रेससाठी सोडण्यास अद्याप तयार नाहीत. उद्या ही जागा राष्टÑवादीने सोडली तरी विखेंना समाधान वाटणार नाही एवढे त्यांना राष्टÑवादीने तिष्टत ठेवले. आपल्या तिकिटावरही हा पक्ष त्यांना उमेदवारी देण्यास तयार दिसत नाही. राष्टÑवादीने एवढ्या काळ ‘वेटिंग’वर ठेवणे हे विखेंना रुचणारे नाही. दबावतंत्रामुळे राष्टÑवादी जागा सोडेल अशी विखे यांची अटकळ होती. परंतु, अद्याप ते साध्य झालेले नाही.
सुजय विखे यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. ‘राजकारणात काहीही शक्य आहे’, असे म्हणत महाजन यांनीही या चर्चेत हवा भरली आहे. विखेंची फरफट होणे हे भाजपलाही हवेच आहे. उमेदवारीचा शब्द मिळाल्यास सुजय विखे भाजपात जातील. मात्र, एकट्या सुजय यांना नाही तर राधाकृष्ण विखे यांनाही भाजपात जावे लागेल. राज्यात मंत्रिपद घेत तेही भाजपात जाऊ शकतात.
अर्थात भाजपमध्ये विखे यांची वाट सुकर राहील का? हाही प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राधाकृष्ण विखे या दोघांची आतून मैत्री असल्याने विरोधीपक्षनेते म्हणून विखे हे आक्रमक राहिले नाहीत, असा आरोप त्यांच्यावर झाला. त्या आरोपाला त्यांच्या भाजप प्रवेशाने पुष्टीच मिळेल. भाजपची ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने जिल्ह्यातील मूळ भाजपचे कार्यकर्ते नाराज होण्याचाही मोठा धोका आहे. मंत्री राम शिंदे, आमदार मोनिका राजळे यांना विखेंचा प्रवेश कितपत मानवेल ही शंका आहे. शिवाजी कर्डिले हे आज विखेंच्या बाजूने बोलत असले तरी उद्या त्यांचीही भूमिका बदलू शकते. कारण विखेंच्या भाजपात येण्यामुळे या सर्वांची मंत्रिपदाची दारे बंद होऊ शकतात. ‘भाजपात या’ असे निमंत्रण कर्डिले हे सहा महिन्यांपासून देत आहेत. मात्र, यात विखे यांना ‘डॅमेज’ करणे हीच त्यांची खेळी दिसते. कर्डिले राजकीयदृष्ट्या अत्यंत धूर्त आहेत.
विखे यांनी आजवर मोदींवर टीका केली. आता भाजपात येऊन मोदी यांचे गोडवे कसे गायचे? हीही मोठी अडचण आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे भाजपने काय हाल केले? याचे उदाहरण त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे विखे यांना भाजप सन्मान देईल का ? हाही प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचे ते भाजपात गेल्यास दक्षिणेत त्यांना रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसचे नेते एक होतील. शरद पवार-थोरात हे दोघेही ताकद लावतील. शिर्डी विधानसभा मतदारसंघातही त्यांच्या विरोधात दोन्ही कॉंग्रेस ताकद निर्माण करेल. त्यामुळे भाजप प्रवेश विखे यांच्यासाठी सुखकारक ठरेल की जोखमीचा ? याबाबत संभ्रम आहे.
विखे भाजपात गेल्यास त्यांचे भाजपपेक्षा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी अधिक मधूर संबंध राहतील. कारण अनेक शिवसैनिकांनी त्यांना आजवर साथ केलेली आहे. विखे व शिवसेना यांची ही मैत्री भाजप ओळखून आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी याही बाबीचा विचार होईल. एकंदरीत विखे यांच्यासमोर सध्यातरी अडचणी अधिक दिसतात.
सोपी वाटणारी निवडणूक त्यांच्यासाठी अवघड व जोखमीची बनली. यातून ते कसा मार्ग काढणार हे बघायचे? विखेंचा आपणाला फायदा-तोटा काय? हा विचार राष्टÑवादी व भाजप हे दोघेही बहुधा करत असावेत. या सर्व राजकारणाकडे कॉंग्रेस कशी पाहते? यावर विखे यांचे कॉंग्रेसमधील भविष्यातील स्थान ठरेल. कॉंग्रेसने त्यांना विरोधीपक्ष नेतेपद दिले. मात्र, हा नेताच आम्ही फोडला असा संदेश भाजपने एकप्रकारे दिला आहे. पुढे जाणे आणि मागे परतणे या दोन्ही बाबी विखेंसाठी आता जोखमीच्या आहेत. निवडणुकीच्या अगोदरच त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
काय म्हणाले होते पवार?
१९९१च्या विखे-गडाख खटल्यात पवार यांच्यामागे न्यायालयाचे शुक्लकाष्ट लागले होते. उमेदवाराचे चारित्र्यहनन केले म्हणून तेही अडचणीत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. पवार यांनाही त्यावेळी दोषी ठरविले असते तर तेही पुढे गडाख यांच्याप्रमाणे सहावर्षापर्यंत निवडणूक लढण्यास अपात्र झाले असते. पवार त्यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले होते, ‘आपण आजवर नऊ निवडणुका लढलो, परंतु कधीही निवडणूक याचिकांना सामोरे जावे लागले नाही. पण निवडणूक प्रचाराला गेलो तेव्हा सामोरे जावे लागले. असो, एका पर्वातून आज आपण मुक्त झालो. या अग्निपरीक्षेतून जाण्याची सुसंधी ज्यांनी मला दिली. त्यांचा मी ऋणी आहे’. हा खटला बहुधा पवार अद्याप विसरलेले नसावेत.
विखे-पवार यांच्यात काय आहे वाद?
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत यशवंतराव गडाख विरुद्ध बाळासाहेब विखे असा सामना झाला होता. त्यावेळी कॉंग्रेसने तिकिट नाकारल्यामुळे विखे यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवली. जनता दलाने त्यांना पाठिंबा दिला होता. साखरसम्राट विखे यांचा पराभव होणे अशक्य आहे, असे राज्यात मानले जात होते. मात्र, विखे यांचा त्यावेळी पराभव झाला. विखे यांच्याविरोधात शरद पवार यांनी त्यावेळी नऊ जाहीर सभा घेतल्या होत्या. आपल्या विरोधात प्रचार करताना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व उमेदवार गडाख यांनी आपले चारित्र्यहनन केले व भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, असा आरोप करत विखे यांनी गडाख यांच्या विजयास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ३० मार्च १९९३ रोजी विखे यांचे अपिल मान्य करत गडाख यांची निवडणूक रद्द ठरविली. चारित्र्यहनन केल्याबद्दल गडाख व शरद पवार या दोघांनाही न्यायालयाने दोषी ठरवले होते. पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे न्यायालयाने गडाख यांची निवडणूक त्यावेळी रद्दच ठरवली होती. मात्र पवार यांना दिलासा दिला होता.