पर्यटकांना खुनावतोय भातोडीचा वैभवशाली इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 05:51 PM2019-09-27T17:51:09+5:302019-09-27T17:51:46+5:30
नगर तालुक्यातील भातोडी गाव जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.
जागतिक पर्यटन दिन विशेष/ योगेश गुंड/ केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी गाव जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावरूपाला येत आहे. ऐतिहासिक नृसिह मंदिर, भातोडीची इतिहास प्रसिद्ध लढाई, ऐतिहासिक तलाव, कलावंतनीचा महल यामुळे भातोडीला ऐतिहासिक महत्त्व आले आहे.
नगर व मराठवाड्याच्या हद्दीवर वसलेल्या भातोडीच्या मेहेकरी नदीच्या तीरावर सुमारे ७०० वर्षे पूर्वीचे दगडी शिल्पातील श्री नृसिंहाचे जाज्वल मंदिर आहे. सन १४४० मध्ये कान्हो नरसोजी नावाच्या वीर प्रधानाने हे मंदिर बांधले असल्याचा काही ठिकाणी इतिहासप्रेमी दाखला देतात. मंदिरासमोर दगडी कोरीव कामातील दीपमाळ आहे. नदीवर भव्य घाटही आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी व इतर संतांची मंदिरे विराजमान आहेत. तसेच नागनाथ श्री काशी विश्वेश्वर व श्री सिद्धेश्वराची मंदिरे आहेत. २०१६-२०१७ मध्ये या मंदिराचा ड वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला होता. नंतर पुढील वर्षी मंदिर क वर्गात आले. त्यामुळे वॉल कंपाउंड तसेच पेव्हर ब्लॉकची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील वर्षात सुशोभीकरणाची अनेक कामे प्रस्तावित आहेत.
१६२४ मध्ये येथे झालेल्या इतिहास प्रसिद्ध लढाईत शहाजीराजे भोसले यांनी कामगिरी बजावून मोठा विजय मिळविला होता. या दरम्यान शरीफजी राजे भोसले यांना मोघलांच्या विरोधात लढाई करताना वीरमरण आले होते. त्यांचे समाधीस्थळ भातोडी गावात आहे. ही लढाई इतिहासातील मोठी लढाई समजली जाते. या लढाईत अतिशय चतुराईने शरीफजी राजे भोसले यांनी तलाव फोडून हजारो मोघलांना जमिनीत गाडले होते. या सह ७५० हेक्टर चा ऐतिहासिक तलाव निजामशाही काळात बांधला गेला आहे, तोही पाहण्यासारखा आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर बीड जिल्ह्याच्या सीमेवर कलावनतीचा महाल आहे. त्याची पडझड झाली असून त्याची दुरूस्ती करण्याची गरज आहे. सन १५८८ मध्ये सलाबत खानने बांधलेला हत्ती बारव प्रसिद्ध आहे. असे हे पुरातन आणि ऐतिहासिक गाव पर्यटकांना खुणावत आहे. शासनानेही येथील पर्यटनस्थळांचा गांभीर्याने विकासकामांत समावेश करणे गरजेचे आहे.
मंदिराचा समावेश ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकासात समाविष्ट करण्यात आला आहे. लवकरच मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कामासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे. शासनाने तीर्थक्षेत्राचा निधी लवकर द्यावा, असे भातोडीचे सरपंच संगीता नेटके यांनी सांगितले.