कमलताई आपटे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:07+5:302021-03-08T04:21:07+5:30
अहमदनगर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या, अंध सेवा मंडळाच्या संस्थापिका श्रीमती कमलाताई आपटे या लवकरच ९७ व्या ...
अहमदनगर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या, अंध सेवा मंडळाच्या संस्थापिका श्रीमती कमलाताई आपटे या लवकरच ९७ व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्यानिमित्त रोटरी क्लब अहमदनगर व मानकन्हैय्या ट्रस्टच्या वतीने त्यांना ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अंध बंधुंसाठी कमलाताई आपटे यांच्या संकल्पनेतून डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या प्रयत्नातून रोटरीने एमआयडीसी येथे उभारलेल्या रोटरी निवारा या घरकुल वसाहतीत रविवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, रोटरी क्लबचे सचिव पुरुषोत्तम जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र आपटे आदींसह रोटरी क्लबचे सदस्य, आपटे परिवार व अंध सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी कमलाताई आपटे म्हणाल्या, नगरमध्ये कोणीही अंध बांधवांसाठी काम करत नव्हते. त्यावेळी डॉ.प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया यांच्यामुळेच अंध बंधू-भगिनींसाठीचे सेवाकार्य सुरू करू शकले. त्यातूनच हा अंध बंधावांसाठी रोटरी निवारा प्रकल्प उभा राहिला आहे. हे कार्य आजही चालू आहे.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, कमलाताई आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २० वर्षांपूर्वी उभा केलेला हा रोटरी निवारा आजही भक्कम स्थितीत उभा आहे. रोटरीच्या इतिहासात एक नवा आदर्श या प्रकल्पाने निर्माण केला आहे. या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून प्रास्ताविक डॉ.सुधा कांकरिया यांनी केले. सविता काळे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या नगर शाखेचे अध्यक्ष संभाजी भोर आदींची भाषणे झाली. डॉ.प्रकाश कांकरिया यांनी कमलाताई आपटेंच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले. यावेळी रोटरीचे नीलेश वैकर, प्रशांत बोगावत, माधव देशमुख, कौशिक कोठारी, महावीर मेहेर, प्रकाश भंडारे उपस्थित होते.
-----------
०७ कमल आपटे
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कमलताई आपटे यांचा रोटरी क्लब व मानकन्हैय्या ट्रस्टतर्फे गौरव करण्यता आला. समवेत डॉ.सुधा व प्रकाश कांकरिया, पुरुषोत्तम जाधव, भालचंद्र आपटे आदी.