अहमदनगर जिल्ह्याला ५० लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 08:42 PM2018-03-20T20:42:38+5:302018-03-20T20:44:31+5:30
जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत दिल्या.
अहमदनगर : जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेंतर्गत ५० लाख झाडे लावली जाणार असून, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी बैठकीत दिल्या.
५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याला ४९ लाख ९३ हजार ५१० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अहमदनगर विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी वामन कदम, सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक अरुण येलजाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या उद्दिष्टापैकी ग्रामपंचायतींना १४ लाख ३० हजार, वन विभागास ३० लाख २० हजार, तसेच इतर यंत्रणेमार्फत ५ लाख ४३ हजार ५१० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात ५९ लाख ४० हजार पेक्षा अधिक रोपे तयार असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. यामध्ये कडूलिंब, सिसम, करंज, आवळा, चिंच, वड यासह आठ ते दहा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी महाजन यांनी झालेल्या बैठकीत दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यात हरित सेनेची सभासद नोंदणी वाढण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात हरित सेना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपवनसंरक्षक रेड्डी यांनी सांगितले. पर्यावरण प्रेमींना हरित सेनेचे सदस्य होऊन या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. आतापर्यत जिल्ह्यात १ लाख ७६ हजार हरितसेनेचे आॅनलाईन सदस्य झाले आहेत. ३१ मार्च २०१८ पर्यंत उर्वरित खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही रेड्डी यांनी सांगितले. मागील दोन्ही वर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केलेले आहे.