ढवळपुरीत उभारणार शेळी, मेंढीपालन रिसर्च सेंटर :बाळासाहेब दोडतले
By अरुण वाघमोडे | Published: August 11, 2019 03:48 PM2019-08-11T15:48:43+5:302019-08-11T15:50:45+5:30
बदलत्या काळानुसार शेळी-मेंढीपालन हे केवळ पारंपरिक उपजीविकेचे साधन न राहता एक व्यवसाय म्हणून त्याचा विकास व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील ढवळपुरी (ता़ पारनेर) येथे राज्यातील पहिले शेळी-मेंढीपालन रिसर्च सेंटर उभारण्यात येणार
अरुण वाघमोडे
अहमदनगर : बदलत्या काळानुसार शेळी-मेंढीपालन हे केवळ पारंपरिक उपजीविकेचे साधन न राहता एक व्यवसाय म्हणून त्याचा विकास व्हावा, यासाठी नगर जिल्ह्यातील ढवळपुरी (ता़ पारनेर) येथे राज्यातील पहिले शेळी-मेंढीपालन रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
दोडतले म्हणाले, पहिल्या टप्यात राज्यात पाच रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे़ सुरुवात ढवळपुरी येथील सेंटरपासून करणार आहे़ याबाबत राज्याच्या पशुसंवर्धन खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे़ येत्या पंधरा दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी मिळेल़ या सेंटरसाठी ढवळपुरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी ५० एकर जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे हे सेंटर उभारणीत काहीच अडचणी येणार नाहीत़ या सेंटरच्या माध्यमातून शेळी-मेंढीच्या नवीन जातींची पैदास, बंदिस्त शेळी-मेंढीपालनासाठीचे संशोधन, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग, बाजारपेठ, व्यवसाय उभारणीत मदत, शासकीय योजनांची माहिती, शेळी-मेंढी पालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ या माध्यमातून शेतकºयांना उद्योजक म्हणून उभा करणे हा उद्देश आहे़ असे सांगत दोडतले म्हणाले, सध्या राज्यात मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून ७० कोटींच्या योजना राबविण्यात येत आहेत़ राज्य शासनाकडे आणखी १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे़
दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या माध्यमातून हा निधी लवकरच उपलब्ध होईल़ केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन खात्यामार्फतही २०० कोटी रुपये मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत़
मेंढपाळांसाठी संरक्षण किट
शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती करणाºया कुटुंबाना मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून एक संरक्षक किट देण्यात येणार आहे़ यामध्ये सौरऊर्जेवर चालणारी बॅटरी, सौरचूल व एक तंबू देण्यात येणार असल्याचे दोडतले यांनी सांगितले़
मेंढपाळांच्या मुलांसाठी वसतिगृह
महाराष्ट्रात मेंढपाळांची मोठी संख्या आहे़ त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशातून महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्णात वसतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे़ धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ त्या माध्यमातून येणाºया काळात या योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे दोडतले म्हणाले़