शेळी चोरांचा ग्रामस्थांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:01+5:302021-04-11T04:21:01+5:30

कर्जत : शेळ्या चोरण्यास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर चोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रकार निंबोडी (ता. कर्जत) येथे घडला. ...

Goat thieves fire on villagers from village huts | शेळी चोरांचा ग्रामस्थांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार

शेळी चोरांचा ग्रामस्थांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार

कर्जत : शेळ्या चोरण्यास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर चोरांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रकार निंबोडी (ता. कर्जत) येथे घडला. गोळीबारात दोघे ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

खंडू गरड (वय ५०) व भरत बर्डे (३५, दोघे रा. निंबोडी, ता. कर्जत) अशी जखमींची नावे आहेत. त्या दोघांनाही पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बापूराव गरड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ अग्रवाल यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांनाही येथे पाचारण केले होते.

कर्जत-जामखेड मार्गापासून आत दोन किलोमीटर अंतरावर निंबोडी गाव आहे. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तिघा चोरांनी दुचाकीहून प्रदीप गरड यांची शेळी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गरड यांना जाग आली. दुचाकीवरून चोरटे शेळी घेऊन जात असल्याचे लक्षात येताच गरड यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांचे इतर नातेवाईकही जागे झाले. ताेपर्यंत चोरांनी दुचाकीवरून धूम ठोकली. सहाजणांनी चोरांचा पाठलाग सुरू केला. यातील बापूराव गरड यांनी दुचाकीवरील तिघा चोरांपैकी मागे बसलेल्या चोराला पकडले. काही वेळ झटापट झाली; मात्र तो चोरटा निसटला. तरीही गावकऱ्यांचा पाठलाग सुरूच होता. गावातून मोठा जमाव एकत्र येत असल्याचे पाहून दुचाकीवर मध्यभागी बसलेल्या चोराने गावठी कट्ट्यातून पाठलाग करणाऱ्या दोघांवर गोळीबार केला. यामध्ये खंडू गरड यांच्या बरगडीला गोळी लागली, तर भरत बर्डे यांच्या कानाला चाटून गोळी गेली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गाेळीबारानंतर चोरांनी दुचाकीवरून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता दोन जिवंत काडतुसे सापडली.

--

१० निंबोडी गोळीबार

निंबोडी येथील गोळीबार झालेल्या घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ अग्रवाल व इतर.

Web Title: Goat thieves fire on villagers from village huts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.