गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी १० डिसेंबरनंतर आवर्तन द्यावे -स्नेहलता कोल्हे

By सचिन धर्मापुरीकर | Published: December 1, 2023 05:49 PM2023-12-01T17:49:21+5:302023-12-01T17:49:29+5:30

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला गोदावरी डावा व उजवा कालव्याद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा होतो.

Godavari canals should be revised for irrigation after 10th December -Snehlata Kolhe | गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी १० डिसेंबरनंतर आवर्तन द्यावे -स्नेहलता कोल्हे

गोदावरी कालव्यांना सिंचनासाठी १० डिसेंबरनंतर आवर्तन द्यावे -स्नेहलता कोल्हे

कोपरगाव (जि. अहमदनगर) : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. त्यामुळे रब्बीसाठी गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना सिंचनासाठी सोडण्यात येणारे आवर्तन १० डिसेंबरनंतर सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

१६ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत यंदा रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन (रोटेशन) सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पाटपाण्याच्या आवर्तनाचे नियोजन काटेकोर करण्याची तसेच रब्बीच्या शिल्लक पाण्यातून उन्हाळी आवर्तनदेखील वाढवून मिळावे, अशी मागणी केली होती. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना सन २०२३-२४ च्या रब्बी हंगामात दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून नियोजन सुरू आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला गोदावरी डावा व उजवा कालव्याद्वारे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा होतो. पाच दिवसांपूर्वी गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसाने कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असून, सद्य:स्थितीत लाभधारक शेतकऱ्यांची सिंचनासाठी पाण्याची मागणी नाही. अजूनही या भागात पावसाळी वातावरण असून, जर पाऊस पडला आणि सिंचनासाठी आवर्तन सोडले तर ते पाणी वाया जाऊ शकते.

दारणा व गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात जे पाणी सोडण्यात येत होते व त्यात अवकाळी पावसामुळे थोडीशी कपात झाली आहे. हे वाचलेले पाणी आणि आगामी काही दिवसांत जर पाऊस पडला तर गोदावरी कालव्यांसाठी आणखी पाणी उपलब्ध होऊ शकते. या उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून गोदावरी कालव्यांना रब्बी हंगामातील दोन आवर्तनासह उन्हाळ्यातही दोन आवर्तने देणे शक्य होईल. त्या दृष्टीने नाशिक पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. त्यामुळे सिंचनासाठी येत्या १० डिसेंबरनंतर आवर्तन सोडण्यात यावे आणि पुढील काळात शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवर्तन देण्याचा पाटबंधारे विभागाने प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

Web Title: Godavari canals should be revised for irrigation after 10th December -Snehlata Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.