गोदावरी नदी बारा हजार क्यूसेक्सने प्रवाही; कोपरगाव, राहत्यासह मराठवाड्याला दिलासा
By सचिन धर्मापुरीकर | Updated: July 25, 2024 21:20 IST2024-07-25T21:20:30+5:302024-07-25T21:20:46+5:30
सध्या गोदावरी नदी बारा हजार क्युसेक पाण्याने प्रवाही झालेली आहे.

गोदावरी नदी बारा हजार क्यूसेक्सने प्रवाही; कोपरगाव, राहत्यासह मराठवाड्याला दिलासा
कोपरगाव ( जि. अहमदनगर) : शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न काही अंशी शमणार आहे. सध्या गोदावरी नदी बारा हजार क्युसेक पाण्याने प्रवाही झालेली आहे.
कोपरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून थोडीफार विश्रांती घेत पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, मका, ऊस, कापूस पिकांना संजीवनी मिळाली आहे. हा पाऊस झाला नसता तर शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली असती. या शिवाय कोपरगाव शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागास ओव्हर फ्लोचे पाणी डाव्या व उजव्या कालव्यात सोडण्याच्या सूचना केल्या.
पाटबंधारे विभागानेही डावा व उजवा कालव्यात पाणी सोडल्याने शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कोपरगाव तालुक्यात बुधवारी झालेल्या पावसाची मंडळ निहाय नोंद पुढील प्रमाणे. कोपरगाव १७ मि.मी., सुरेगाव १२ मि.मी., रवंदे १५ मि.मी., पोहेगाव १२ मि.मी. या पावसामुळे कुठलीही जिवीत व आर्थिक हाणी पोहोचली नसल्याची माहिती नायब तहसीदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे दारणा धरणातुन गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता २ हजार ४२१ क्युसेकने सुरू असलेला विसर्ग गुरूवारी सकाळी सात वाजता ३ हजार १५५ क्युसेक करण्यात आला. दुपारी एक वाजता तो वाढवून १० हजार १३२ तर सायंकाळी पाच वाजता ११ हजार ९४६ क्युसेक्स येवढा करण्यात आला. हे पाणी कोपरगाव शहरातील गोदावरी नदीपात्रात पोहोंचले आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरण साठे
गंगापुर ४९.९५ टक्के, दारणा ८१.३७ टक्के, कडवा ८१.५८टक्के, पालखेड २४.३५ टक्के, मुकणे २७.७८ टक्के, करंजवण ५.५९ टक्के, गिरणा ११.७४ टक्के, हतनुर ३३.०२ टक्के, वाघुर ६३.३८ टक्के भरले आहे. फोटो- २५कोप गोदावरी नदी