आठ लाखांच्या सोन्यावर डल्ला मारणारे दोन दिवसांत गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:21 PM2018-08-10T12:21:22+5:302018-08-10T12:21:30+5:30
शहरातील डॉ. प्रविण क्षिरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे ८ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारणा-या चार चोरट्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या २ दिवसात गजाआड केले. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.
राहुरी : शहरातील डॉ. प्रविण क्षिरसागर यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे ८ लाख रुपयांच्या सोन्यावर डल्ला मारणा-या चार चोरट्यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अवघ्या २ दिवसात गजाआड केले. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.
७ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी दीड ते तीन वाजण्याच्या दरम्यान राहुरी शहरातील शेटे इस्टेट परिसरातील यशवंत कॉम्प्लेक्समधील डॉ. प्रविण राधाजी क्षिरसागर यांच्या घरात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला होता. घरात उचकापाचक करुन कपाटातील ७ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सुमारे ३० ते ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले होते. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसून आले. त्यानुसार शिळीमकर यांनी तपासाची चक्रे फिरवली होती. दरम्यान पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, हवालदार विष्णू घोडेचोर, रवींद्र कर्डीले, सचिन मिरपगार, मनोज गोसावी, राजकुमार मेठेकर, विजय ठोंबरे, योगेश गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवा काळे, संभाजी कोतकर, दिपक शिंदे, रवी सोनटक्के यांच्या पथकाने दिनांक ९ आॅगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान शनी शिंगणापूर फाटा येथे सापळा लावला. यावेळी हुंदाई कंपनीची यु.पी.- १६, ए.के.- ३८३९ नंबरच्या चारचाकीमधून चोरटे जात होते. यावेळी इरफान इर्शद कुरेशी (वय ३८ वर्षे), इनाम मेहमूद कुरेशी (वय ३६ वर्षे, जि. हाकुड) आणि अस्लीम वसुरुद्दीन मरिक (वय ३५ वर्षे), इर्शाद अब्दूल रहिम झोजा (वय ४५, दोघे जि- सिकंदराबाद) या चार जणांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. यावेळी तर नदिम ऊर्फ बंटी कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेतील सर्व आरोपी उत्तर प्रदेशमधील असून त्यांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.