पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लांबविल्या
By Admin | Published: June 29, 2016 12:48 AM2016-06-29T00:48:31+5:302016-06-29T00:56:57+5:30
अहमदनगर : पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात इसमांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या.
अहमदनगर : पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात इसमांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. ही घटना सोमवारी सकाळी रेणावीकर शाळेजवळील सिद्धीविनायक सोसायटी परिसरात घडली.
सिद्धीविनायक सोसायटीमध्ये राहणाऱ्या आशा अनंत सहस्त्रबुद्धे (वय ७१) या घरात एकट्याच होत्या. यावेळी दोन अनोळखी तरुण सेल्समन म्हणून घरात घुसले. पितळी भांडे चमकण्यासाठीची पावडर विकतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडील पावडरने त्यांनी भांडे घासून दिली. त्यानंतर विश्वास संपादन करून हातातील ४० ग्रॅम वजनाच्या बांगड्याही पॉलिश करण्यासाठी घेतल्या. त्या बांगड्यांना पावडर लावून त्या पाण्यात टाकल्या. हातचलाखी करीत पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवून दोघे पसार झाले.
काहीवेळानंतर त्या भांड्यात बांगड्या नसल्याचे सहस्त्रबुद्धे यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल डी. बी. शेरकर तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)