दीड तोळ्याची सोन्याची चैन ग्राहकाला परत केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 04:16 PM2019-06-23T16:16:44+5:302019-06-23T16:16:58+5:30
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या तळेगाव दिघे शाखेतील कर्मचारी
तळेगाव दिघे : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या तळेगाव दिघे शाखेतील कर्मचारी सतीष नामदेव पोकळे यांच्या प्रामाणिकपणामुळे एका ग्राहकाची विसरलेली दीड तोळे किंमतीची सोन्याची चैन परत करण्यात आली. त्याबद्दल ग्राहकांतर्फे प्रामाणिकपणाबद्दल बँक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या तळेगाव दिघे येथील शाखेचे वडझरी खुर्द येथील खातेदार नानासाहेब सोपान सुपेकर हे गुरुवारी बँकेत त्यांचे लॉकर आॅपरेट करण्यासाठी आले होते. सुपेकर हे त्यांचे लॉकर आॅपरेट करीत असताना त्यांच्याकडून सोन्याची चैन बाजूला तशीच पडून राहिली. बँकेचे कर्मचारी पोकळे हे लॉकरची खातरजमा करीत असताना त्यांना बाहेर असलेली चैन सापडली. ही चैन सुपेकर यांची असल्याची खात्री झाल्यानंतर बँकेचे शाखा व्यवस्थापक रमेश पवार यांनी सापडलेली चैन सुरक्षित असल्याबाबत ग्राहकास कल्पना दिली. दीड तोळ्याची चैन सुरक्षित असून ती परत मिळणार असल्याच्या बातमीने सुपेकर यांना दिलासा मिळाला. ग्राहक सुपेकर यांनी शनिवारी बँकेत येऊन प्रामाणिकपणाबद्दल कर्मचारी पोकळे, व्यवस्थापक पवार व अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
पोकळे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल बँकेचे अध्यक्ष अमित पंडित, उपाध्यक्ष दत्तात्रय खुळे, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाघ, संचालक किसनराव सुपेकर व तळेगाव दिघे येथील ग्रामस्थांनी कौतुक केले.