आढावा बैठकीला वीजपुरवठ्याचे कारण देत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा 'शॉक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 02:18 PM2020-10-09T14:18:57+5:302020-10-09T14:19:06+5:30
शेवगाव-पाथर्डी तालुक्यात वारंवार होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्याला शेतकरी वैतागले असतानाच आता याचा फटका तालुक्यातील प्रशासकीय कारभाऱ्यांनाही बसला आहे.
शेवगाव : वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, शेवगावकर हैराण झालेले असताना, या गलथान कारभाराचा 'शॉक' प्रशासकीय अधिकाऱ्यांना बसला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला ऑनलाईन हजर राहाता न आलेल्या अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड १९ संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ऑनलाईन आढावा बैठक बोलावली होती. बैठकीला प्रांताधिकारी देवदत्त केकाण, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे, पाथर्डीचे तहसीलदार शाम वाढकर हे उपस्थित होते. मात्र शहरात सकाळपासून विज नसल्याने कार्यालयातील इलेट्रॉनिक सर्व उपकरणे बंद पडली होती. बॅटरीवर चालणाऱ्या इन्व्हर्टरचा बॅकअप पॉवर संपला होता. अर्ध्या तालुक्यात विज पुरवठा खंडीत असल्याने बहुतांशी आस्थापना, कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक साधनांवर चालणारे सर्व व्यवहार बंद होते. तहसिल कार्यालयातही विज नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी विज वितरण कंपनीला संपर्क साधून विज पुरवठा खंडीत असल्याचे कळवले तसेच विज पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याची माहिती विचारली. परंतु, त्यांना अहमदनगरवरुन विज पुरवठा खंडीत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी ऑनलाईन बैठकीला शेवगाव विभागातील अधिकारी हजर नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधत चांगलेच सुनावताना 'त्या' अधिकाऱ्यांना तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात हजर होण्याचे फर्मान सोडले. वरिष्ठांचा आदेश मिळताच विनाविलंब तीनही अधिकारी अहमदनगरकडे रवाना झाले. गत सोमवार ( दि. ६ ) रोजीही विज पुरवठा नसल्याने 'त्या' अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहता आले नव्हते, अशी माहिती मिळत आहे.